पाऊस पडेल; पण उन्हाचा कडाका कमी होणार नाही; नागपुरात पारा ४३ अंशांवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2023 09:53 PM2023-05-20T21:53:46+5:302023-05-20T21:54:15+5:30
Nagpur News नागपुरात उन्हाचा कडाका कायम आहे. शनिवारी कमाल तापमान ४३ अंश सेल्सिअसवर पोहोचले. सकाळपासूनच सूर्य किरणे तापायला लागली आहेत. दुपारनंतर रस्त्यांवरील वाहतूक निम्म्यावर येते. पुढील काही दिवस उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे.
नागपूर : नागपुरात उन्हाचा कडाका कायम आहे. शनिवारी कमाल तापमान ४३ अंश सेल्सिअसवर पोहोचले. सकाळपासूनच सूर्य किरणे तापायला लागली आहेत. दुपारनंतर रस्त्यांवरील वाहतूक निम्म्यावर येते. पुढील काही दिवस उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील तीन ते चार दिवसांत वादळी वाऱ्यासह पाऊस पडू शकतो. मात्र पारा ४२ ते ४३ अंशांच्या आसपास राहणार असल्याचेही स्पष्ट झाले आहे. यावरून मे महिन्याच्या उरलेल्या दिवसांत उन्हाच्या कडाक्यातून दिलासा मिळण्याची आशा नाही. पुढील ४८ तासांत मध्य भारतात पारा २ ते ३ अंशांनी वाढण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम नागपूरसह विदर्भातील जिल्ह्यांवर दिसून येईल.
दरम्यान, दक्षिण पूर्व मान्सून हळूहळू पुढे सरकत असल्याचे वृत्त आहे. ३ दिवसांत मान्सूनचे ढग बंगालचा उपसागर, अंदमान आणि निकोबार बेटांवर पोहोचण्याची शक्यता आहे. विदर्भात सर्वाधिक ४४.४ अंश तापमान अकोला येथे नोंदविण्यात आले. वर्ध्यात ४४, तर चंद्रपुरात ४३.४ तर बुलढाण्यात ४०.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
नागपुरात रात्रीचे तापमान २४.९ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. सामान्यपेक्षा तीन अंशांनी कमी झाल्यानंतरही रात्री उष्णतेपासून दिलासा मिळत नाही. नागपुरातील आर्द्रता सकाळी ३३ टक्के होती, तर संध्याकाळी ती २० टक्क्यांवर आली. सूर्यास्तानंतरही वाहणाऱ्या उष्ण वाऱ्यामुळे नागरिक त्रस्त आहेत.
जूनमध्येही दिलासा नाही
मागील पाच दशकांच्या आकडेवारीचा अभ्यास करून हवामान खात्याने गेल्या वर्षी नागपुरात मान्सूनच्या आगमनाची तारीख १० जून ऐवजी १६ जून निश्चित केली आहे. दक्षिण भारतात मान्सूनचे आगमन उशिरा होण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम नागपुरातही होईल. सर्वकाही सुरळीत राहिल्यास दि. २५ जूनच्या सुमारास नागपुरात मान्सूनचे ढग दाखल होण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तविली आहे. याचा विचार करता जूनमध्येही उन्हापासून दिलासा मिळणार नाही.