नागपूर : यंदा दहावीच्या निकालात नागपूर विभागाप्रमाणे नागपूर जिल्ह्याही माघारल्याचे चित्र आहे. जिल्ह्याचा निकाल ९२.३२ टक्के लागला असून दरवर्षीप्रमाणे यंदाही उत्तीर्णांमध्ये मुलींची टक्केवारी मुलांपेक्षा भारी ठरली. शहरातून साेमलवार निकालसची जान्हवी अजय शेंडे व रमेश चांडक इग्लिश मीडियम स्कूलची रिया दीपक दातीर या दाेन्ही विद्यार्थिनींनी ९९.४० टक्के गुण प्राप्त करीत जिल्ह्यातून अव्वल स्थान प्राप्त केले आहे.
नागपूर जिल्ह्यातून यंदा ५७,८०९ विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली, ज्यामध्ये २९,२३५ मुले आणि २८,५७४ मुलींचा समावेश हाेता. यापैकी ५३,३७४ विद्यार्थी यशस्वी ठरले. यात २६,२६७ मुलांचा समावेश आहे तर २७,१०७ मुलींचा समावेश आहे. उत्तीर्णांमध्ये मुलांची टक्केवारी ८९.८४ टक्के आणि मुलींची टक्केवारी ९४.८६ टक्के आहे. नागपूर शहराचा विचार परीक्षेला बसलेल्या ३१,४४८ विद्यार्थ्यांपैकी २८,९७६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये १४,०५३ मुले आणि १४,९२३ मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. शहरातही ९४.४४ टक्क्यांसह मुलींनी बाजी मारली आहे. तर नागपूर ग्रामीणमध्ये ९५.३१ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत.
९९.४० टक्क्यांसह टाॅपर राहिलेल्या जान्हवी शेंडेला नृत्याच्या १५ आणि रिया दातीर या विद्यार्थिनीच्या गुणांमध्ये इंटरमीडिएटच्या ५ गुणांची भर पडली. त्यांच्यानंतर तेजस्विनी विद्या मंदिरची साैंदर्या रामदास जिभकाटे या विद्यार्थिनीने ९८.८ टक्के आणि याच शाळेचा अंकित सुभाष गुप्ता या विद्यार्थ्यानेही ९८.८ टक्के गुण प्राप्त करीत संयुक्तपणे दुसरे स्थान पटकाविले. याशिवाय पं. बच्छराज व्यास विद्यालयाचा सर्वेश राजेश तामगडे ९८.४ टक्के गुणांसह तिसऱ्या स्थानी राहिला तर साेमलवार रामदासपेठच्या आदित्य रविकांत गुडधे या विद्यार्थ्याने ९७.८ टक्के गुण प्राप्त केले.
१३ हजार विद्यार्थी प्राविण्य श्रेणीत
नागपूर जिल्ह्यातून उत्तीर्ण झालेल्या ५३,३७४ विद्यार्थ्यांपैकी १३,२२६ विद्यार्थ्यांनी प्राविण्य श्रेणीत स्थान मिळविले आहे. यानंतर १९,०४५ विद्यार्थी ग्रेड-१ तर १५,४७९ विद्यार्थी ग्रेड-२ मध्ये उत्तीर्ण झाले. प्राविण्य श्रेणीमध्येही मुलींचाच वरचष्मा बघायला मिळाला.
३१४ शाळांचा निकाल १०० टक्केजिल्ह्यातील काही शाळांना आपले १०० टक्के यश कायम ठेवले. जिल्ह्यातील ३१४ शाळांनी १०० टक्के यश प्राप्त केले आहे. याशिवाय ३५२ शाळा ९० ते ९९ टक्क्यांच्या श्रेणीत आहेत. ८० ते ९० टक्के यश मिळविणाऱ्या १९१ शाळा आहेत. ४ शाळांचा निकाल १० ते २० टक्क्यांमध्ये लागला आहे.