नागपूर : युती तुटल्याची घोषणा झाल्यानंतर शिवसेनेचे जिल्हा प्रमुख शेखर सावरबांधे यांनी रात्री उशिरा संपर्क प्रमुख डॉ. दीपक सावंत यांच्याशी चर्चा करून नऊ उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. कामठी, सावनेर व दक्षिण-पश्चिम तीन मतदारसंघातील उमेदवारांच्या नावांवर रात्री उशिरापर्यंत चर्चा सुरू होती. उद्या, शुक्रवारी सकाळी या तीन जागांवरील उमेदवारांची घोषणा केली जाईल. दक्षिण नागपूर मतदारसंघावर जिल्हाप्रमुख शेखर सावरबांधे, राष्ट्रवादीतून शिवसेनेत दाखल झालेले किशोर कन्हेरे, किरण पांडव यांनी उमेदवारी मागितली होती. शेवटी किरण पांडव यांना उमेदवारी देण्यात आली. पूर्व नागपुरात अजय दलाल, पश्चिममध्ये याच मतदारसंघाचे विधानसभा अध्यक्ष दिगंबर ठाकरे, मध्य नागपुरात सतीश हरडे व उत्तर नागपुरात बंडू पारवे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. नागपूर : ग्रामीणमध्ये रामटेकचा गड सर करण्याची जबाबदारी पुन्हा एकदा आ. आशीष जयस्वाल यांच्यावर सोपविण्यात आली. हिंगणा मतदारसंघाची धुरा माजी खा. प्रकाश जाधव यांच्याकडे तर काटोलमध्ये नरखेड पंचायत समितीचे सभापती राजू हरणे यांना तर उमरेडमध्ये ज. मो. अभ्यंकर यांना संधी देण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सावनेरमध्ये भाजपच्या असंतुष्टांवर सेनेचा डोळा आहे. कामठीमध्येही आपल्याच पक्षाच्या तगड्या उमेदवाराला राजी करण्यासाठी सेनेला जोर लावावा लागत आहे. (प्रतिनिधी)
जयस्वाल, जाधव, पांडव, हरणे मैदानात
By admin | Published: September 26, 2014 1:21 AM