उमरेड : जोगीठाणा पेठ परिसरात असलेली पुरातन सार्वजनिक विहीर जेसीबीच्या माध्यमातून उद्ध्वस्त करण्यात आली. सदर विहीर पालिकेच्या जागेवर असून पालिकेने विहिरीच्या तोंडीवर लोखंडी जाळीसुद्धा लावली होती, असे नागरिकांचे म्हणणे आहे. जेसीबीच्या माध्यमातून लोखंडी जाळीची तोडफोड करण्यात आली. शिवाय माती टाकून सदर विहीर बुजविण्यात आली. याप्रकरणी उमरेड पालिकेचे अभियंता जगदीश पटेल यांना विचारणा केली असता रमेश कारगावकर यांचे नाव समोर आले आहे. कारगावकर यांना याप्रकरणी पालिकेने नोटीस बजावले असल्याची माहिती पटेल यांनी दिली. कारगावकर यांनी याबाबतची कागदपत्रे सादर केली असून या जागेबाबतचा वाद सुरू असल्याची माहिती आहे. विहीर खासगी असो वा सार्वजनिक ती बुझविण्यासाठी परवानगीची गरज असते, अशीही बाब समोर येत असून याप्रकरणी तातडीने कारवाई करण्याची मागणी मनोज पंडित, सुधन लांजेवार, महेश मुंधडा, मेहबूब पठाण, महादेव जाधव, अनिल बांगरे, चंद्रशेखर बुटके, कृष्णा मुंधडा, शंकर निमजे, शाहू सदावर्ती, संदीप भगत, बंडु शेरकी, विवेक लांजेवार आदींनी केली आहे. जेसीबी चालक तसेच सदर जेसीबी जप्त करण्यात यावी, अशीही मागणी जोर धरत आहे.
---
उमरेड जोगीठाणा पेठ येथे जेसीबीच्या माध्यमातून विहीर बुजविण्यात येत असल्याचा पुरावा