लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘आयआयटी’मध्ये प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या ‘जेईई-ऍडव्हान्स’चा निकाल सोमवारी जाहीर झाला. शहरातून अथर्व डबली हा विद्यार्थी अव्वल क्रमांकावर राहिला. त्याने देशपातळीवर १०१ वा क्रमांक पटकाविला. नागपूर शहरातून १०० हून अधिक विद्यार्थी चांगल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले असल्याची माहिती विविध महाविद्यालयांतून प्राप्त झाली. आयआयटी-दिल्लीतर्फे ‘जेईई-ऍडव्हान्स’चे आयोजन करण्यात आले होते.यंदा कोरोनामुळे ‘जेईई-मेन्स’ लांबली. यात उत्तीर्ण झालेले विद्यार्थी ‘जेईई-ऍडव्हान्स’साठी पात्र ठरले होते. २७ सप्टेंबर रोजी ‘जेईई-ऍडव्हान्स’ची परीक्षा पार पडली. अथर्वपाठोपाठ आदित्य कडू (एआयआर-११२) व अरज खंडेलवाल (एआयआर-१२१) यांनी बाजी मारली. तर प्रेरक मेश्राम (एआयआर-५३५) व स्तवीर मुंद्रे (एआयआर-६३७) यांनीदेखील उल्लेखनीय कामगिरी केली. ‘जेईई-ऍडव्हान्स’मध्ये नागपुरातून सहाशेहून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते. यातील शंभरहून अधिक विद्यार्थी हे आयआयटीत प्रवेशासाठी पात्र ठरले आहेत. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा निकाल निराशाजनक राहिले.आयआयटी दिल्लीत प्रवेश घेणार - अथर्वजेईई अॅडव्हान्समध्ये शहरातून प्रथम क्रमांक पटकविणाºया अथर्वने अभ्यासाला खूप वेळ मिळाल्याचे स्पष्ट केले. आयआयटी दिल्ली येथे संगणक विज्ञान शाखेत प्रवेश घ्यायचा आहे. यानंतर संशोधन क्षेत्रात जायचे असल्याचे त्याने सांगितले.संशोधन क्षेत्रात जाणार : आदित्यआदित्य कडूला संगणक विज्ञान क्षेत्रात उच्चशिक्षण घ्यायचे आहे. त्यानंतर संशोधन क्षेत्रात जाण्याचा मानस आहे. परीक्षेचे निकाल अपेक्षेप्रमाणेच आले असल्याचे त्याने सांगितले.