योगेश पांडे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : जेवणासाठी बसलेल्या एका सुरक्षारक्षकाला त्याच्या जुन्या सहकाऱ्याने धक्का दिल्याने बेसमेंटमधील चिखलात पडून त्याचा मृत्यू झाला. राणाप्रतापनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे.
अशोक दौलत मालखेडे (५८, मनिषनगर, बेलतरोडी) असे मृतक सुरक्षारक्षकाचे नाव आहे. ते एस्कॉर्ट सिक्युरिटी फोर्स या कंपनीसाठी सुरक्षारक्षकाचे काम करायचे. त्यांची ड्युटी एन सी बॅनर्जी ॲंड कंपनी, पराते हॉलच्या बाजुला या अर्धवट बांधकाम असलेल्या इमारतीत लागली होती. शनिवारी सकाळी सा़डेआठ वाजताच ते घरून निघाले. त्या दिवशी नाईट ड्युटीदेखील असल्याने ते डबा घेऊनच निघाले होते. रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास ते जेवायला बसत असताना त्यांच्या कंपनीत अगोदर नोकरीवर असलेला भूषण दादाराव कोहळे (३२, आष्टी, वर्धा) हादेखील तेथे आला. बोलताना त्याने मालखेडे यांना धक्का दिला. ते वरच्या माळ्यावरून बेसमेंटमध्ये पडले.
संबंधित इमारत ही अनेक वर्षांपासून अर्धवट अवस्थेत पडली असून बेसमेंटमध्ये पाणी व चिखल साचले आहे. त्यांच्या डोळा व डोक्यावर मार लागला. त्यांना चिखलातून बाहेर काढण्यासाठी अग्निशमन दलाला बोलवावे लागले. त्यांना बाहेर काढल्यावर लगेच मेडिकल इस्पितळात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांची मुलगी रोशनी गजानन डांबरे (३१, मनिषनगर) हिच्या तक्रारीवरून राणाप्रतापनगर पोलीस ठाण्यात कोहळेविरोधात गुन्हा दाखल केला असून त्याला अटक करण्यात आली आहे.