लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : दिल्लीहून अमेरिकेच्या सॅनफ्रॅन्सिस्कोला पहाटे ३ वाजता जाणारे आंतरराष्ट्रीय विमान जेट एअरवेज कंपनीच्या चुकीने सुटल्यामुळे कंपनीवर आर्थिक भरपाईचा दावा करणार असल्याची माहिती जेट एअरवेज कंपनीच्या नागपूर-दिल्ली विमानातील प्रवासी व वरिष्ठ नागरिक राजेंद्र वानखेडे आणि छाया वानखेडे या दाम्पत्याने लोकमतशी बोलताना दिली.गुरुवार, ५ एप्रिलला नागपूरहून दिल्लीला सायंकाळी ५.२० वाजता जाणारे जेट एअरवेजचे विमान रात्री १२ नंतरही निघाले नव्हते. सायंकाळी ४.४५ वाजता विमानात बसविल्यानंतर रात्री ९ वाजता विमानात बिघाड झाल्याचे कारण सांगून विमानातून खाली उतरविले. जवळपास चार तास विमानातील एसी बंद होता. श्वसनाचा त्रास झाला. कंपनीच्या अधिकाऱ्याने साधी विचारपूस केली नाही वा खाण्यास काहीही दिली नाही. वयस्क असल्यामुळे मानसिक त्रास झाला. दिल्लीत वेळेवर नाही पोहोचल्यास अमेरिकेला कसे जाणार, अशी भीती मनात होती. अखेर दिल्ली न जाण्याचा आणि अमेरिका वारी रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे दोघांचे नागपूर-दिल्ली प्रवासाची रक्कम आणि दिल्ली ते सॅनफ्रॅन्सिस्को प्रवासाचे दीड लाख रुपये वाया गेले. रात्री १२ वाजता नागपुरात भाच्याकडे मुक्काम करण्याचा निर्णय घेतला.सॅनफ्रॅन्सिस्कोच्या फ्रिमोन्ट शहरात मुलगी आणि जावई राहतात. त्यांनी आमचे विमानाचे तिकीट काढले होते. विमान सुटल्यामुळे त्यांनी पुन्हा आमच्या दोघांचे रविवारचे दिल्ली ते सॅनफ्रन्सिस्कोचे तिकीट काढले. त्यासाठी त्यांना जवळपास भारतीय चलनात ३.५ लाख रुपये खर्च आला. शिवाय नागपूर ते दिल्लीकरिता विमानाच्या तिकिटाचे अतिरिक्त पैसे मोजावे लागले. आता रविवारी सकाळी ८.३० वाजता दिल्लीला आणि त्याच दिवशी सायंकाळी ५.३० वाजता एअर इंडियाच्या विमानाने सॅनफ्रॅन्सिस्कोला रवाना होणार आहे.या प्रकरणी वकिलांशी चर्चा केल्यानंतर जेट एअरवेज कंपनीवर आर्थिक भरपाईचा दावा टाकण्याचा निर्णय घेतला. वकिलांनी पासपोर्ट, तिकिटे आणि आधारची झेरॉक्स मागितली आहे. आम्ही सहा महिने अमेरिकेत मुलीकडे राहणार आहे. केस कोर्टात दाखल करण्यासाठी मुलगा डॉ. शिरीष वानखेडे वकिलांना मदत करणार आहे. विमान रद्द झाल्याचे सांगितल्यापासून रात्री १२ वाजेपर्यंत कंपनीच्या अधिकाºयांनी दिलेली वागणूक अतिशय वेदनादायी होती. आमच्यासोबत २०० प्रवाशांना त्रास झाला. कंपनीला धडा शिकविण्यासाठी कोर्टात दावा टाकण्याचा निर्णय घेतल्याचे राजेंद्र वानखेडे यांनी सांगितले.
जेट एअरवेजवर आर्थिक भरपाईचा दावा करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 07, 2018 12:05 AM
दिल्लीहून अमेरिकेच्या सॅनफ्रॅन्सिस्कोला पहाटे ३ वाजता जाणारे आंतरराष्ट्रीय विमान जेट एअरवेज कंपनीच्या चुकीने सुटल्यामुळे कंपनीवर आर्थिक भरपाईचा दावा करणार असल्याची माहिती जेट एअरवेज कंपनीच्या नागपूर-दिल्ली विमानातील प्रवासी व वरिष्ठ नागरिक राजेंद्र वानखेडे आणि छाया वानखेडे या दाम्पत्याने लोकमतशी बोलताना दिली.
ठळक मुद्दे प्रवासी राजेंद्र वानखेडे : कंपनीच्या चुकीने अमेरिकेचे विमान सुटले