नागपुरात जेट एअरवेजच्या विमानात २००प्रवाशांचा गोंधळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2018 12:23 AM2018-04-06T00:23:00+5:302018-04-06T00:23:14+5:30
विमानाच्या इंजिनात बिघाड झाल्याचे कारण देत जेट एअरवेजच्या विमानात दोन तास बसवून खाली उतरविलेल्या २०० प्रवाशांनी विमानतळावर गोंधळ घातला. विमान कंपनीने सत्यस्थिती न सांगितल्यामुळे प्रवाशांना आलेला अनुभव अत्यंत वेदनादायी होता, अशी प्रतिक्रिया तुषार मंडलेकर या प्रवाशाने लोकमतशी बोलताना दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विमानाच्या इंजिनात बिघाड झाल्याचे कारण देत जेट एअरवेजच्या विमानात दोन तास बसवून खाली उतरविलेल्या २०० प्रवाशांनी विमानतळावर गोंधळ घातला. विमान कंपनीने सत्यस्थिती न सांगितल्यामुळे प्रवाशांना आलेला अनुभव अत्यंत वेदनादायी होता, अशी प्रतिक्रिया तुषार मंडलेकर या प्रवाशाने लोकमतशी बोलताना दिली. पर्यायी व्यवस्था न केल्यामुळे प्रवाशांचा गोंधळ आणखी वाढला. अनेक स्थानिक प्रवासी घरी परतल्याची माहिती आहे.
मंडलेकर यांनी सांगितले की, जेट एअरवेजचे नागपूर-दिल्ली विमान (९डब्ल्यू ०६५८) सायंकाळी ५.२० वाजता उड्डाण दिल्लीला भरणार होते. त्यासाठी प्रवाशांना ४.४५ वाजता विमानात बसविण्यात आले. वेळ निघून गेल्यानंतरही विमानाने उड्डाण न भरल्यामुळे प्रवासी क्रू मेंबरला विचारणा करू लागले. पण त्यांच्याकडून प्रवाशांना वारंवार उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. अखेर विमानाचे उड्डाण रद्द झाल्याचे सांगून प्रवाशांना विमानातून खाली उतरण्यास सांगितले. प्रवासी दोन तास विमानात बसून असताना एसी वा पंखे पूर्णपणे बंद होते. त्यामुळे अनेकांना श्वास घेण्यास त्रास झाला. प्रवाशांना विमानातून खाली उतरविल्यानंतर नवीन बोर्डिंग पासेस देण्यात आल्या, पण हे विमान सहा तास उशिराने अर्थात रात्री १२ नंतर जाणार असल्याचे सांगण्यात आले.
या दरम्यान कंपनीने लहान मुले आणि वरिष्ठ नागरिकांना खाण्यासाठी काहीही दिलेले नाही. प्रवाशांना आलेला अनुभव अतिशय त्रासदायक आणि वेदनादायी होता. अनेक प्रवाशांनी तिकिटाची रक्कम परत करण्याची मागणी केली. तुषार मंडलेकर या प्रवाशांनी टष्ट्वीटरवर केलेल्या तक्रारीनंतर जेट एअरवेज कंपनीने आमची चमू परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे आणि समस्या सोडविण्याचा प्रयत्न करीत असल्याचे म्हटले आहे. पण प्रवाशांना काहीही सोईसुविधा वा जेवण दिले नाही.