यातनांचा प्रवास थांबला! हातापायावरचे ओरखडे माणुसकीच्या मलमाने भरून निघाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2020 09:45 AM2020-05-15T09:45:26+5:302020-05-15T09:48:12+5:30

हमार देस मे हमे जल्दी भेजो ना साहेब! ही त्यांची प्राण डोळ्यात आणून केलेली विनवणी खुद्द पोलीस आयुक्तांच्या जीवाचीही घालमेल वाढवून गेली. खुद्द पोलीस आयुक्तांनी लोकमत जवळ परप्रांतीय मजुरांच्या भावना गुरुवारी व्यक्त केल्या.

The journey of torture has stopped! The scratches on the limbs were filled with the ointment of humanity | यातनांचा प्रवास थांबला! हातापायावरचे ओरखडे माणुसकीच्या मलमाने भरून निघाले

यातनांचा प्रवास थांबला! हातापायावरचे ओरखडे माणुसकीच्या मलमाने भरून निघाले

Next
ठळक मुद्देमनातील खोच कायमनागपूर मरेपर्यंत विसरता येणार नाही, गावोगावच्या मजुरांची भावना

नरेश डोंगरे।
लोकमत न्यूज नेटवर्क
मैं अकेलेही चला था जानिबे ए मंजिल की और।
लोग जुडते गये और कारवा बनता गया!!
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ज्या ठिकाणी रक्त आटवले, हाडाची काड करून गगनचुंबी इमारती उभारल्या, तेथे वीतभर पोटाची खळगी भरणे शक्य झाले नाही. मात्र ज्या शहराचे फक्त नावच ऐकून होतो त्या नागपूरने शरीरावरील सर्व ओरखडे भरून काढले. पोटभर अन्नही दिले. आपल्यातील काही साथीदार त्यांच्या गावाकडे रवाना देखील झाले. हे त्यांच्यासाठी आश्वासक आहे. मात्र, आपल्याला अजून आपल्या गावाला जायला मिळाले नाही, याची अजूनही त्यांना हुरहूर आहे. पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांच्याजवळ या गरीब बेसहारा मजुरांनी आपल्या भाषेत त्यांना आपल्या वेदना ऐकवल्या. हमार देस मे हमे जल्दी भेजो ना साहेब! ही त्यांची प्राण डोळ्यात आणून केलेली विनवणी खुद्द पोलीस आयुक्तांच्या जीवाचीही घालमेल वाढवून गेली. खुद्द पोलीस आयुक्तांनी लोकमत जवळ परप्रांतीय मजुरांच्या भावना गुरुवारी व्यक्त केल्या.
कोरोनाने सगळ्यांचीच दाणादाण उडविली आहे. भल्याभल्यांची त्रेधातिरपीट उडाली आहे. तेथे पोट भरण्यासाठी शेकडो मैलांवरून मजुरांनी येणे फारच वाईट आहे.
लॉकडाऊननंतर या बिचाऱ्यांचे जगणेच कैद झाले आहे. ज्या शहरात मोठमोठ्या इमारती उभारण्यासाठी त्यांनी आपल्या रक्ताचा घाम अन हाडाची काड केली तेथे लॉकडाऊननंतर त्यांना आसरा मिळेनासा झाला. उपाशीपोटी किती दिवस राहणार, असा प्रश्न स्वत:च स्वत:ला करून त्यांनी ‘गड्या आपला गाव बरा’ म्हणत चक्क पायीच गावाचा रस्ता धरला. कुणी हैदराबादहून निघाले, कुणी तामिळनाडू, कुणी चेन्नई तर कुणी मुंबई, नाशिकमधून रेल्वेच्या रुळावरून वाटा तुडवू लागले. जंगल, झुडपातील काट्याकुट्यानी त्यांच्या हातापायाला अक्षरश: ओरबडून काढले आहे. रस्त्यात अनेक गावे लागली. काही ठिकाणी त्यांना अन्न मिळाले मात्र काही ठिकाणी पाणीदेखील मिळाले नाही. मोठ्यांचे भागून जाते, चिल्यापिल्यांना काय सांगणार. मात्र उपाय नव्हता. त्यामुळे पुढचे गाव गाठण्यासाठी रात्रंदिवस ही मंडळी यातना सोबत घेऊन प्रवास करत होती. अखेर नागपूर आले. शहराला जोडणाऱ्या सर्व सीमांवर, नाक्यांवर पायपीट करणाºया मजुरांसाठी तात्पुरते पेंडॉल टाकण्यात आलेले आहेत. इथे या मजुरांची नोंदणी होत आहे. ते कुठून आले, त्यांना कुठे जायचे आहे, ते सर्व लिहून घेतले जात आहे. केवळ एवढ्यावरच नागपूरकर थांबले नाही. या बिचाऱ्यांच्या खाण्यापिण्याचीही सोय करण्यात आली आहे. त्यांना तात्पुरता निवारा उपलब्ध करून देण्यात आला आहे. शेकडो मजुरांसाठी शेल्टर होममध्ये व्यवस्था करण्यात आली आहे.

नागपूरपासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या मध्य प्रदेश, छत्तीसगड, आंध्रप्रदेश, तेलंगणा या प्रांतातील मजुरांना त्यांच्या त्यांच्या प्रांतात नेऊन सोडण्यासाठी सेवाभावी संस्था संघटनांच्या माध्यमातून पोलिसांनी बसेसची सोय केली आहे. जी मंडळी बिहार, उत्तर प्रदेश, ओडिशा, झारखंड अशा दूरवरच्या राज्यातील आहे, त्यांच्यासाठी ट्रेनची व्यवस्था आहे. अनेकांना त्यांच्या गावाला पाठविण्यात आले आहे तर अनेकांना प्रवासाची व्यवस्था होईपर्यंत थांबवून घेण्यात आले आहे. रोजच पायपीट करून नागपुरात येणाऱ्या मजुरांची संख्या मोठी आहे. पोटात तहानभूक घेऊन आलेल्या या बिचाऱ्यांना पोटभर जेवण दिले जात आहे. स्वच्छ पाणी आणि आवश्यक त्या सोयी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यांची व्यवस्था नीट आहे की नाही, ते बघण्यासाठी पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय दिवसभर वेगवेगळ्या मजुरांच्या कॅम्पला भेटी देऊन तेथील मजुरांची वास्तपुस्त करत आहेत. या आपलेपणाने ही मंडळी भारावून गेली आहे. ती पोलीस अधिकाऱ्यांजवळ आपल्या भावना व्यक्त करीत आहेत.
ज्या शहरांसाठी आम्ही आमचे रक्त आटवले. तेथे आमची सोय झाली नाही. मात्र ज्या शहराचे फक्त नाव ऐकले होते, त्या नागपुरात आम्हाला पोटभर जेवायला मिळाले आहे. शरीरावर पडलेल्या जखमांवर उपचारही मिळाले असून मनावरही आपुलकीची फुंकर घातली गेली आहे. आमच्या सोबत वाटा तुडवत आलेले वेगवेगळ्या ठिकाणचे अनेक जण त्यांच्या त्यांच्या जिल्ह्यात निघून गेले आहे. याचा खूपच आनंद वाटत आहे.आता आम्हालाही लवकरात लवकर आमच्या गावाला सोडून देण्याची व्यवस्था करा, अशी विनवणी ते करत आहेत. या भावना व्यक्त करताना त्यांच्या डोळ्यात कृतज्ञता दिसते. ज्यांना कालपरवा पर्यंत कधी बघितले नाही आणि भविष्यात ते समोर येतील, याचीही सुतराम शक्यता नाही, अशी ही गरीब मंडळी आम्ही नागपूरला कधीच विसरू शकणार नाही, असे म्हणत आहे. आपल्या आयुष्यातील ही घडी आपलेही संचित आहे. ठिकठिकाणी होत असलेली मजुरांची दैना मनाला अस्वस्थ करत असताना नागपूरकरांकडून मजुरांच्या व्यवस्थेसाठी मिळणारी साथ पोलिसांच्या प्रयत्नांना सुखद आणि भक्कम बळ देणारी आहे, मजुरांच्या वेदनांचा प्रवास थांबला ही आत्यंतिक सुखद बाब आहे, असे लोकमत जवळ व्यक्त होताना पोलीस आयुक्त म्हणतात.

अनेकांनी अक्षरश: झोकून दिले
प्रारंभी परप्रांतीय मजुरांची व्यवस्था कशी होईल, हा प्रश्न धडकी भरवत होता. मात्र, चांगले काम करायला सुरुवात केली की आपसूकच ईश्वर मदतीला धावून येतो. येथे असेच झाले आहे.
एकीकडे प्रचंड दहशत बघायला मिळत आहे. दुसरीकडे सेवायज्ञाच्या या धगधगत्या कुंडात हजारो नागपूरकर सेवेकऱ्यांनी स्वत:ला अक्षरश: झोकून दिले आहे. असा अनुभव कधीच आला नाही आणि भविष्यातही तो येईल, असे वाटत नाही, असेही पोलीस आयुक्त डॉ. उपाध्याय म्हणतात.

 

Web Title: The journey of torture has stopped! The scratches on the limbs were filled with the ointment of humanity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.