न्यायाधीशावरील हल्ला प्रकरण : दीपेश पराते यांना जामीन मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2018 08:31 PM2018-12-28T20:31:30+5:302018-12-28T20:34:55+5:30
पाचवे वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीश किरण देशपांडे यांना मारहाण करणारे सहायक सरकारी वकील अॅड. दीपेश मदनलाल पराते यांना सत्र न्यायालयाने शुक्रवारी सशर्त जामीन मंजूर केला. अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही.जी. रघुवंशी यांनी हा निर्णय दिला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पाचवे वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीश किरण देशपांडे यांना मारहाण करणारे सहायक सरकारी वकील अॅड. दीपेश मदनलाल पराते यांना सत्र न्यायालयाने शुक्रवारी सशर्त जामीन मंजूर केला. अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही.जी. रघुवंशी यांनी हा निर्णय दिला.
१४ हजार रुपयांचा जामिनदार सादर करावा, साक्षीदारांवर दबाव आणण्याचा व पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करू नये, फिर्यादीची भेट घेऊ नये, दोषारोपपत्र दाखल होतपर्यंत दर रविवारी सदर पोलीस ठाण्यात हजेरी लावावी इत्यादी आदेश न्यायालयाने पराते यांना दिले आहेत. या प्रकरणावर गुरुवारी सुनावणी पूर्ण झाली होती. त्यानंतर न्यायालयाने राखून ठेवलेला निर्णय शुक्रवारी जाहीर करण्यात आला. पराते यांच्याविरुद्धचा भादंविच्या कलम ३५३ (कर्तव्यावरील सरकारी अधिकाऱ्यावर हल्ला करणे) अंतर्गतचा गुन्हाच केवळ अजामीनपात्र आहे. या गुन्ह्यात पाच वर्षे कारावासाची कमाल शिक्षा आहे. न्यायालयात पराते यांच्यातर्फे अॅड. मंगेश मून व अॅड. योगेश मंडपे तर, सरकारतर्फे अॅड. जी. एन. दुबे यांनी कामकाज पाहिले.
सरकारकडून कारवाई नाही
जिल्हा सरकारी वकील नितीन तेलगोटे यांनी या घटनेची राज्य सरकारला माहिती कळविली आहे. परंतु, घटनेला दोन दिवस लोटूनही सरकारने पराते यांच्याविरुद्ध काहीच कारवाई केली नाही. यासंदर्भात शुक्रवारी सायंकाळी तेलगोटे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी सरकारकडून अद्याप काहीच निर्देश प्राप्त झाले नाही असे सांगितले. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मात्र या घटनेची तत्काळ दखल घेऊन पराते यांच्याविरुद्ध फौजदारी अवमानना याचिका दाखल करून घेतली. तसेच, पराते यांना नोटीस बजावून यावर उत्तर दाखल करण्याचा आदेश दिला.