व्यंजनांची लज्जत अन् मोहक कलाकृती
By admin | Published: January 4, 2015 01:01 AM2015-01-04T01:01:08+5:302015-01-04T01:01:08+5:30
दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्यावतीने आयोजित आॅरेंज सिटी क्राफ्ट मेळाव्याला आजपासून प्रारंभ करण्यात आला. भारतातील विविध प्रदेशातील संस्कृती दर्शविणाऱ्या लोकनृत्याची रंगत,
आॅरेंज सिटी क्राफ्ट मेळावा : मोहक कलाकृतींची रसिकांना भुरळ
नागपूर : दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्यावतीने आयोजित आॅरेंज सिटी क्राफ्ट मेळाव्याला आजपासून प्रारंभ करण्यात आला. भारतातील विविध प्रदेशातील संस्कृती दर्शविणाऱ्या लोकनृत्याची रंगत, भारतभरातील लोकसंगीताची मजा आणि मॅजिक शो आणि पारंपरिक लज्जतदार व्यंजनासह हस्तशिल्पकारांच्या मोहक कलाकृतींनी आज नागपूरकरांना जिंकले. पहिल्याच दिवशी नागपूरकरांनी या मेळाव्याला भरपूर प्रतिसाद दिला. यासाठी केंद्र परिसर खास सजविण्यात आला आहे. रंगीबेरंगी फुगे, तोरणे, रंगीत प्रकाशयोजना, विविध कलाकृतींची मांडणी आणि मनोरंजनांच्या साधनांनी हा मेळावा उत्साहाने फुलला होता.
या मेळाव्याचे उद्घाटन सायंकाळी २१ राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त हस्तशिल्पकारांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी केंद्र संचालक डॉ. पीयूषकुमार प्रामुख्याने उपस्थित होते. त्यांच्या हस्ते सर्व हस्तशिल्पकरांचा सत्कार करण्यात आला आणि दीपप्रज्वलनाने मेळाव्याचा प्रारंभ झाला. मागील २२ वर्षापासून हा महोत्सव आयोजित करण्यात येतो. यंदा मात्र या महोत्सवासाठी विशेष तयारी करण्यात आली. संपूर्ण केंद्र परिसराला एखाद्या गावाचे स्वरूप देण्यात आले असून येथे गेल्यावर आपण शहराबाहेरील एखाद्या सुसज्ज गावात आल्याचाच भास नागरिकांना सुखावणारा आहे. हा महोत्सव देशातील सर्वश्रेष्ठ हस्तशिल्प महोत्सव करण्यासाठी यंदा खास प्रयत्न करण्यात आले आहेत. महोत्सवात संपूर्ण भारताच्या कानाकोपऱ्यातून आलेले लोकनृत्य कलावंत, हस्तशिल्पकार, लोकसंगीत आणि कलावंतांच्या कलाकृती आकर्षणाचा बिंदू आहेत. यंदा प्रथमच महोत्सवात वस्तू आणि उत्पादनांचा दर्जा राखण्याच्या दृष्टीने राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर पुरस्कारप्राप्त हस्तशिल्पकारांना आमंत्रित करण्यात आले आहे.
हा प्रयोग देशभरातील केंद्रामधून प्रथमच दक्षिण मध्यने केला आहे. लोकनृत्यांच्या सादरीकरणासह लोकसंगीताचे गायन आणि वादन, लुप्त होत चाललेल्या जादू या कलेलाही नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न केंद्राने केला आहे. जादूचे प्रयोग पाहताना लोकही यात रंगले होते. एरवी जादूचे प्रयोग फारसे पहायला मिळत नाहीत पण जादूचे प्रयोग सादर होत असल्याचे पाहून बच्चे कंपनीसह मोठ्यांनाही या प्रयोगांनी आकर्षित केले.
अनेकांमध्ये काहीतरी कला असते पण त्यांना सादरीकरणाची संधी मिळत नाही. येथील फूड झोनमध्ये ‘मुझे भी कुछ कहना है’ या उपक्रमांतर्गत कुणीही आपली कला येथे सादर करू शकतो. तशी विशेष व्यवस्था महोत्सवात करण्यात आली आहे. महोत्सवात जंक फूड, विदेशी फूड आणि डबाबंद उत्पादने न ठेवता ताजे पदार्थ आहेत.
केंद्र परिसराला ग्रामीण ‘फेस्टीव्ह लुक’
यंदा केंद्र परिसर विचारपूर्वक सजविण्यात आला आहे. प्रत्येक कानाकोपरा सुंदर दिसेल याची काळजी घेत केंद्र परिसर रंगीबेरंगी तोरण, पताका आणि विद्युत प्रकाशाने सजविण्यात आल्याने खास वातावरणनिर्मिती झाली आहे. याशिवाय कठपुतलीच्या शो पाहण्यासाठी रसिकांसाठी बसण्याची व्यवस्था आणि राजस्थानला ज्या पद्धतीने कठपुतलीचे शो होतात तशी विशेष पडद्यासह सोय करण्यात आली आहे. वातावरण प्रसन्न राहावे म्हणून आकाशदिवे, प्रकाशयोजना करण्यात आली आहे.
गुणवत्तापूर्ण उत्पादने आणि हस्तशिल्प
प्रदर्शनात यंदा देशाच्या कानाकोपऱ्यातील हस्तशिल्पकारांना आमंत्रित करण्यात आल्याने उत्पादनांचा आणि कलाकृतींचा दर्जा व गुणवत्ता सांभाळण्यात आला आहे. विविध प्रदेशातील विशिष्ट उत्पादनांची, कलाकृतींची मोठी रेंज येथे उपलब्ध करून देण्यात केंद्र यशस्वी ठरले. त्यामुळे येथे छोट्या जागेत संपूर्ण भारताचे प्रतिनिधित्व पाहायला मिळते. काश्मीर ते कन्याकुमारी विविध प्रदेशांचे हे एकत्रिकरण करण्यामागे राष्ट्रीय एकात्मतेचाही उद्देश आहे. गुणवत्तापूर्ण वस्तूमुळे येथे भेट देणाऱ्या नागरिकांमध्येही खरेदीचा उत्साह आहे.
मनोरंजनासाठी प्रयत्न
केंद्र परिसरात कुठल्याही कोपऱ्यात गेल्यावर काहीना काही मनोरंजनाची साधने येथे आहेत. आत गेल्यावर केंद्राच्या कार्यालयासमोर बंदराचा हुबेहूब वेश धारण केलेला कलावंत परिश्रमाने उपस्थितांचे मनोरंजन करतो. तो माणूस आहे याचाही विसर पडावा, असे त्याचे बंदरासारखे नक्कल करणारे सादरीकरण बच्चे कंपनीच्या खास आकर्षणचे केंद्र झाले. सध्या सेल्फीचा जमाना आहे. हे ओळखून विविध पेहरावात स्वत:चा फोटो काढून घेण्याची सुविधा येथे उपलब्ध आहे. पगडी, लुगडे, घागरा, रंगीबेरंगी विग्ज आदी अनेक पेहरावाची साधने अल्प दरात येथे उपलब्ध असून वेगवेगळ्या वेशात स्वत:चे फोटो काढून थेट फेसबुकवर टाकण्याचे आवाहनही येथे करण्यात आले आहे.