तिळे जन्मणाऱ्या महिलेच्या पाठीशी ‘जंगोराइतड्’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2018 11:34 PM2018-04-06T23:34:58+5:302018-04-06T23:35:14+5:30
बाळाचा जन्म हा प्रत्येकच घरच्यांसाठी आनंदाचा क्षण असतो. जुळे झाले तर आनंद द्विगुणित होतो, मात्र तिळे होणार म्हटल्यावर जास्त आनंद होतो असे नाही. सुखरुप जन्माला आलेही तरी आर्थिक विवंचनेत असणाऱ्या गरीब कुटुंबासाठी तीन मुलांचा सांभाळ मोठी समस्या ठरतो. ‘ती’च्या व कुटुंबासमोरही हे संकट उभे ठाकले होते. मात्र या संकटसमयी जंगोराइतड आदिवासी विकास संस्थेने तिला आधार दिला. संस्थेने तिच्या बाळंतपणाचा खर्च उचलला आणि वर्षभर त्या बाळांची जबाबदारीही स्वीकारली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बाळाचा जन्म हा प्रत्येकच घरच्यांसाठी आनंदाचा क्षण असतो. जुळे झाले तर आनंद द्विगुणित होतो, मात्र तिळे होणार म्हटल्यावर जास्त आनंद होतो असे नाही. सुखरुप जन्माला आलेही तरी आर्थिक विवंचनेत असणाऱ्या गरीब कुटुंबासाठी तीन मुलांचा सांभाळ मोठी समस्या ठरतो. ‘ती’च्या व कुटुंबासमोरही हे संकट उभे ठाकले होते. मात्र या संकटसमयी जंगोराइतड आदिवासी विकास संस्थेने तिला आधार दिला. संस्थेने तिच्या बाळंतपणाचा खर्च उचलला आणि वर्षभर त्या बाळांची जबाबदारीही स्वीकारली.
या महिलेचे नाव नेहा आत्राम असे आहे. पांढराबोडी येथे राहणाऱ्या नेहाने ५ एप्रिलला दोन मुली व मुलाला जन्म दिला. एरवी अशावेळी मुले अॅबनॉर्मल जन्मण्याचा धोका अधिक असतो. मात्र तिन्ही गुटगुटीत मुलांना जन्म देणारी नेहा याबाबतीत सुदैवी ठरली. काही महिन्यापूर्वी मात्र नेहा व तिच्या कुटुंबासमोर चिंतेचे ढग जमा झाले होते. त्यावेळी नेहा धरमपेठच्या डॉ. स्मिता चतुर्वेदी यांच्याकडे ट्रीटमेंट घेत होती. आपल्या पोटात तीन मुले वाढताहेत हे जेव्हा तिच्या लक्षात आले, तेव्हा ती हादरलीच होती. एकतर तिला आणि बाळांना धोका होण्याची शक्यता भीतीचे कारण होते. नेहाचे पती एका कंपनीत कामाला जातात. आर्थिक परिस्थिती वाईट असल्याने तीन मुलांचा सांभाळ कसा करावा, हा प्रश्न तिच्या व कुटुंबाच्या समोर उभा ठाकला. जीवाचा धोका व गरिबीची चिंता यामुळे दोन मुलांना पोटातच नष्ट करावे का, हा विचारही तिच्या मनात घोळत होता. विज्ञानाच्या प्रगतीमुळे हे शक्यही झाले असते कदाचित.
डॉ. स्मिता यांनी गरीब गरोदर महिलांसाठी काम करणाºया जंगोराइतड् आदिवासी विकास संस्थेचे अध्यक्ष प्रबोध वेखंडे यांना सांगितले. वेखंडे व संस्थेच्या इतर सहकाºयांनी नेहा व तिच्या कुटुंबाचे समुपदेशन करून दोन्ही पर्यायासाठी हवी ती मदत करण्याचा विश्वास दिला. संस्थेचा आधार मिळाल्याने नेहानेही तिळ्यांना जन्म देण्याचा निर्णय ठामपणे घेतला. तेव्हापासून ते बाळंतपण होईपर्यंत सर्व खर्च जंगोराइतड् संस्थेने केला आहे. यापुढे वर्षभर माता व तिन्ही बाळांचा औषधोपचार, आहार आणि इतर खर्च करण्याची जबाबदारी संस्थेने स्वीकारली आहे. त्यामुळे तिचे बाळंतपण सुखदायी ठरले असून बाळंत वेदनेतून तीही सुखावली आहे.
काय आहे जंगोरातड् संस्थेचे कार्य?
जंगोराइतड् ही संस्था गेल्या दोन वर्षापासून गरीब बाळंत महिलांसाठी कार्य करीत आहे. बाळंतपणाचा खर्चही न पेलणाऱ्या कुटुंबातील गरीब महिलांना औषधोपचार व डॉक्टरांचे समुपदेशन व बाळंतपणानंतर तीन महिने माता व बाळाच्या औषधोपचार व सकस आहाराची जबाबदारी संस्थेकडून उचलली जाते. यादरम्यान माता किंवा बाळाला काही आजार झाल्यास त्यांच्या आॅपरेशनपासून उपचारापर्यंतचा खर्च संस्थेद्वारे केला जातो. दोन वर्षात संस्थेने ४० महिलांना अशाप्रकारे मदत केली आहे. यावर्षी संस्थेने आतापर्यंत १५ महिलांच्या बाळंतपणाची जबाबदारी उचलली आहे. नेहाच्या बाळांचा वर्षभराचा खर्च आणि त्यानंतरही हवी तशी मदत करण्याचा विश्वास प्रबोध वेखंडे यांनी दिला.