केवळ चालानपासून बचावासाठी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2020 04:26 AM2020-12-11T04:26:28+5:302020-12-11T04:26:28+5:30
- आयएसआय मार्कविना सर्रास विक्री : गंभीर अपघाताचा धोका जास्त नागपूर : दुचाकी वाहनावरून वाहतूक करताना सुरक्षेसाठी हेल्मेट महत्त्वाचे ...
- आयएसआय मार्कविना सर्रास विक्री : गंभीर अपघाताचा धोका जास्त
नागपूर : दुचाकी वाहनावरून वाहतूक करताना सुरक्षेसाठी हेल्मेट महत्त्वाचे आणि आवश्यक आहे. अपघातात हेल्मेटमुळे डोक्याला गंभीर इजा होत नाही आणि वाहनचालक सुरक्षित राहतो. पण अनेकजण त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे. केवळ वाहतूक पोलिसांच्या चालानपासून बचावासाठी सुरक्षित आयएसआय हेल्मेटऐवजी अनेकजण ‘टोपी हेल्मेट’चा उपयोग करताना रस्त्यावर दिसून येत आहेत. अशा हेल्मेटच्या उपयोगकर्त्यांवर कारवाई करण्याची मागणी आता पुढे आली आहे.
नंदनवन येथील श्री साई ऑटोमोबाईल्सचे संचालक अशोक आणि विजय आमधरे म्हणाले, आम्ही केवळ आयएसआय मार्कचे आणि संपूर्ण सुरक्षा देणाऱ्या हेल्मेटची विक्री करतो. पण सध्या रस्त्यावर गुणवत्ता नसलेल्या आयएसआय मार्क नसलेल्या ‘टोपी हेल्मेट‘ची सर्रास विक्री होत आहे. त्यामुळे वाहनचालकांचा जीव धोक्यात येऊ शकतो. पण पोलिसांच्या चालानपासून बचावाची लोकांची कवायत दिसून येत आहे. पोलीस आणि प्रशासनाने अशा हेल्मेटच्या विक्रीवर प्रतिबंध आणावा. देशात दुचाकी वाहनचालकांना केवळ भारतीय मानक ब्यूरोतर्फे प्रमाणित अर्थात आयएसआय हेल्मेटची निर्मिती आणि विक्री करावी, असे केंद्र सरकारचे आदेश आहेत. याकरिता एक नियमावली जारी केली आहे. पण त्याचा फारसा परिणाम वाहनचालकांवर होताना दिसत नाही. आयएसआय मार्क नसलेले स्वस्त ‘टोपी हेल्मेट’ लोक वापरत आहेत. अशा प्रकारे ते स्वत:च आपला जीव धोक्यात टाकत आहेत.
वाहतूक पोलिसांनी कारवाई करावी
ग्राहक पंचायतचे विदर्भ प्रांत संघटन मंत्री गजानन पांडे म्हणाले, टोपी हेल्मेट घालून वाहन चालविणाऱ्यांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई करावी. हे हेल्मेट वाहतुकीच्या नियमाविरुद्ध आहे. केवळ पोलिसांची फसवणूक करण्यासाठी लोकांनी टोपी हेल्मेट घालण्याची युक्ती अवलंबविली आहे. सुरक्षेच्या दृष्टीने ही बाब घातक आहे.
वाहनचालक महेंद्र आदमने म्हणाले, फुल हेल्मेट घातल्याने समोरचे पाहण्यास आणि ऐकण्यास तसेच श्वास घेण्यास त्रास होतो. याशिवाय डोक्यातून घाम येतो. त्यामुळे टोपी हेल्मेटचा उपयोग करतो. त्यामुळे त्रास होत नाही.
केंद्र सरकारच्या निर्देशानुसार आयएसआय मार्क नसलेल्या हेल्मेटची विक्री करणाऱ्यांवर भारतीय मानक ब्यूरोला कारवाई करण्याचे अधिकार आहेत. आयएसआय प्रमाणित हेल्मेटची निर्मिती आणि विक्री करण्याचे या विभागाचे निर्देश आहेत. अधिकाऱ्यांनी सांगितले, प्रारंभी देशात दुय्यम दर्जाच्या हेल्मेट निर्मितीवर प्रतिबंध लावण्याची गरज आहे. अशा हेल्मेटची निर्मिती न झाल्यास बाजारात विक्रीसाठी येणार नाहीत आणि कमी गुणवत्तेच्या हेल्मेटचा उपयोग होणार नाही.