'कबीरा खडा बाजार में सबकी मांगे खैर'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2018 10:04 PM2018-01-27T22:04:06+5:302018-01-27T22:13:37+5:30
तब्बल ३८ पात्रांचा अभिनय..४३ रागातील दोहे..अवधी भाषेचा मधाळ गोडवा..काशीला स्पर्श करीत वाहणाऱ्या गंगेच्या काठावर दिवसागणिक वाढणारा कबीर आणि त्याच्या प्रत्येक शब्दातून व्यक्त होणारे जीवनाचे तत्त्वज्ञान..अशा अडीच तासांच्या वेगवान संगीत नाटकाद्वारे शेखर सेन यांनी नागपूरकरांना संत कबीर या नावाचा अन्वयार्थ साभिनय सांगितला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : तब्बल ३८ पात्रांचा अभिनय..४३ रागातील दोहे..अवधी भाषेचा मधाळ गोडवा..काशीला स्पर्श करीत वाहणाऱ्या गंगेच्या काठावर दिवसागणिक वाढणारा कबीर आणि त्याच्या प्रत्येक शब्दातून व्यक्त होणारे जीवनाचे तत्त्वज्ञान..अशा अडीच तासांच्या वेगवान संगीत नाटकाद्वारे शेखर सेन यांनी नागपूरकरांना संत कबीर या नावाचा अन्वयार्थ साभिनय सांगितला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या खासदार महोत्सवात शनिवारी ‘संत कबीर’ या एकपात्री संगीत नाटकाच्या ४१२ व्या प्रयोगाने प्रेक्षकांना अंतर्मुख केले. भव्य रंगमंचावर अगदी शून्य नेपथ्य असतानाही शेखर सेन यांनी केवळ त्यांच्या जिवंत अभिनयाने एकहाती या नाटकाला एका वेगळ्या उंचीवर नेले. कुठूनतरी लांबून नदीत वाहत येणारा एक बालक निरू नावाच्या नावाड्याला सापडतो आणि तो त्याला घरी घेऊन येतो. निरूची पत्नी निमा त्याला पोटच्या बाळाप्रमाणे सांभाळते. परंतु तो या दाम्पत्याच्या पोटी जन्माला आला नसल्याने त्याला समाजात पदोपदी अपमान सहन करावा लागतो. हा अपमानच त्याला निर्विकार विधात्याच्या शोधासाठी प्रोत्साहित करतो आणि पुढे हा शोध कबीराला ‘संत कबीर’ बनवून टाकतो. शेखर सेन यांच्या सिद्धहस्त लेखणीतून जन्मलेल्या या नाटकाला त्यांच्या गोेड आवाजातील दोह्यांनी अधिक रंजक केले. ‘पाथर पुजे हरी मिले... तो मै पूजू पहाड रे...’ असेल किंवा ‘कबीरा खडा बाजार में सबकी मांगे दुआ, न काहू से दोस्ती न काहू से बैर...’ यासरख्या कबीराच्या गाजलेल्या दोह्यांनी या नाटकात रंगत भरली. ‘औरत जात का रोना और कुंभकर्ण का सोना अगर एक बार शुरू हो जाए तो बस रुकने का नाम हीं नहीं लेते...’ यासारख्या विनोदी संवादांनीही श्रोत्यांच्या खूप टाळ्या मिळवल्या.