कमलेश वानखेडे, नागपूर :काँग्रेसच्या स्थापना दिनानिमित्त नागपुरात २८ डिसेंबर रोजी होऊ घातलेल्या महारॅलीसाठी दाभा परिसरातील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या जागेवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. या सभेला लाखोंची गर्दी खेचण्याचे नियोजन असून शहर काँग्रेसतर्फेनागपूर शहरातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघाला १० हजारांचे टार्गेट देण्यात आले आहे. सोबतच सभेचे एकूणच नियोजन सांभाळण्यासाठी १२ पदाधिकाऱ्यांची नियोजन समिती स्थापन करण्यात आली आहे.
सभेच्या पूर्वतयारीचे नियोजन करण्यासाठी शनिवारी सकाळी शहर अध्यक्ष आ. विकास ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली देवडिया काॅग्रेस भवनात बैठक झाली. काँग्रेसच्या देशव्यापी महारॅलीचे आयोजन करण्याचे यजमानपद शहर काँग्रेसला मिळाल्याने संपूर्ण जबाबदारी शहर काॅग्रेस कमेटीवर आली असून प्रत्येक पदाधिकाऱ्याने आपली जबाबदारी पार पाडावी, असे आ. ठाकरे यांनी सांगितले. महारॅलीमध्ये वरिष्ठ नेते, प्रदेश पदाधिकारी,ब्लाॅक अध्यक्ष, फ्रन्टल प्रमुख, सेल अध्यक्ष, शहर पदाधिकारी, आपआपल्या टिम सोबत आणि प्रभाग व वॉर्डातून किती लोक आणतील याचे नियोजन केले जाईल. शहर काॅग्रेसच्या १२ पदाधिकाऱ्यांची नियोजन समिती तयार केली जाईल. ही समिती दररोज सायंकाळी ४ ते रात्री ८ पर्यंत काॅग्रेस कमेटीच्या कार्यालयात बसून गाडया, बॅनर, पोस्टर, गाडयाची पार्किग ही सर्व व्यवस्था सांभाळेल.
बैठकीमध्ये आ. ॲड. अभिजीत वंजारी, सोशल मिडिया अध्यक्ष विशाल मुत्तेमवार, उद्योग व वाणिज्य सेल अध्यक्ष अतुल कोटेचा, प्रशांत धवड, संजय महाकाळकर, गिरीश पांडव, डाॅ.गजराज हटेवार, रमन पैगवार, प्रा.दिनेश बानाबाकोडे,आकाश तायवाडे, सेवादलाचे अध्यक्ष प्रविण आगरे, महिला अध्यक्ष नॅश अली, ब्लाॅक अध्यक्ष राजेश पौनीकर, प्रविण गवरे, विश्वेश्वर अहिरकर, दिनेश तराळे, पंकज थोरात, राजकुमार कमनानी, देवेद्र रोेटेले, ईरशाद मलिक, सुनिता ढोले, मोतीराम मोहाडीकर, रवि गाडगे पाटील,गोपाल पटटम, डाॅ.प्रकाश ढगे, डाॅ.मनोहर तांबुलकर, महेश श्रीवास, प्रा.हरीश खंडाईत, इसराईल शेख, ऋतिका डफ, सदन यादव, ॲड. अभय रणदिवे, रेखा बाराहाते, नेहा निकोसे, विवेक निकोसे, लंकेश ऊके, सरफराज खान, राहुल मोरे, डाॅ.सुधीर आघाव,आशीष दिक्षित, मनोज चवरे आदी उपस्थित होते.