लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : काश्मीरचा प्रश्न हा सोपा नाही. तो जुना आजार आहे. त्यासाठी उपचारही वेगळ्या पद्धतीने करण्याची गरज आहे. काश्मीरबाबत सरकार सर्वच पातळीवर प्रामाणिक प्रयत्न करीत आहे. एकीकडे सीझफायरही केले तर दुसरीकडे सर्जिकल स्ट्राईकही केले. हा प्रश्न सहजतेने सुटणारा नसला तरी काश्मीर शांत होईल आणि तो भारताचा अभिन्न अंग राहील, असा विश्वास देशाचे गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी येथे व्यक्त केला.सी.मो. झाडे फाऊंडेशनतर्फे चालविण्यात येणाऱ्या सत्यनारायण नुुवाल गुरुकुल व्यसनमुक्ती केंद्रातर्फे देण्यात येणारा डॉ. गिरीश गांधी राष्ट्रीय सामाजिक कार्य पुरस्कार काश्मीरी मुलांसाठी कार्य करणाऱ्या पुण्याचे संजय नहार यांच्या सरहद संस्थेला प्रदान करताना ते बोलत होते. मानपत्र, स्मृतिचिन्ह व एक लाख रुपये असे पुरस्काराचे स्वरूप होते. यावेळी महापौर नंदा जिचकार, खा. कृपाल तुमाने, आ. बाळू धानोरकर, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. यशवंत मनोहर, लोकमत दिल्ली आवृत्तीचे संपादक सुरेश भटेवरा, सर्वोदयी विचारवंत मा.म. गडकरी, रवी कालरा उपस्थित होते. यावेळी व्यसनमुक्तीसाठी कार्य करणाऱ्या मंगेश शनवारे व अभय लांजेवार यांचाही विशेष सत्कार करण्यात आला.हंसराज अहीर म्हणाले, काश्मीरमध्ये देशभक्त नागरिकांची कमतरता नाही. परंतु काही गट आहेत. ज्यांना पाकिस्तानात प्रशिक्षण देऊन भारतात पाठवले जाते. त्यांना देशाच्या सीमेत घुसू न देता जागेवरच ठार मारणे हा उपाय आहे. सरकार ते करीत आहे. आतापर्यंत २१३ दहशतवादी मारल्या गेले. पहिली गोळी आपण चालवणार नाही, परंतु सीमेपलीकडून आली तर प्रत्युत्तरात दहा गोळ्या झाडा, असे आदेश देण्यात आले आहे. काश्मीरमध्ये सरकार स्थापन करणे हा सुद्धा एक प्रयोग म्हणूनच करण्यात आला होता. नॉर्थ ईस्टमध्येसुद्धा असाच प्रयोग केला. तेथे सरकारने निधी दिला. तेथील नक्षलवाद जवळपास संपला आहे. तेथे शांती प्रस्थापित करण्यात सरकारला यश आले. तेथील लोकांनी विकास करून घेतला आहे. परंतु काश्मीरमध्ये ते होऊ शकले नाही.नोटाबंदीमुळे नक्षलवादी व दहशतवाद्यांना होणारी फंडिंग थांबली होती. तीन महिन्यांपर्यंत त्यांच्या कारवाया बंद होत्या. त्यांना खाण्याचे लाले पडले होते. यादरम्यान हजारो दहशतवाद्यांनी आत्मसमर्पण केले. परंतु तेथील दहशतवाद्यांना आता विदेशातून पैसा पुरवला जात आहे. सर्वात महत्त्वाचा त्रास ‘व्हॉट्सअॅप’ मॅसेज आहे. शुक्रवारी हा त्रास जास्तच असतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.यशवंत मनोहर, महापौर नंदा जिचकार, खा. कृपाल तुमाने, आ. बाळू धानोरकर यांनीही विचार व्यक्त केले. ज्येष्ठ पत्रकार विकास झाडे यांनी प्रास्ताविक केले. बाळ कुळकर्णी यांनी संचालन केले. नारायण समर्थ यांनी आभार मानले.
काश्मीर प्रश्न भावनिकतेतूनच सुटेल - सुरेश भटेवरासुरेश भटेवरा यांनी यावेळी काश्मीर प्रश्नावर सखोल विवेचन केले. काश्मीरचा प्रश्न मनातल्या सावत्र भावनेचा असून तो भावनिकतेतूनच सोडवावा लागेल, असे स्पष्ट केले.
हा देश काश्मिरींचा आहे - संजय नहारकाश्मिरी लोक हे भारताचेच आहेत. ते भारतातून कधीच जाणार नाहीत. परंतु काश्मिरींचे भारतावरील प्रेम कमी होण्याची काही कारणे आहेत. ती कारणे शोधली पाहिजेत. त्यासाठी काश्मीर आमचे आहे, असे म्हणण्याऐवजी हा देश काश्मिरींचा आहे, असे म्हणावे लागेल, असे संजय नहार यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हटले. तसेच यावेळी पुरस्कार स्वरूप मिळालेली एक लाख रुपयाची रक्कम त्यांनी सी.मो.झाडे फाऊंडेशन या संस्थेलाच प्रदान केली.