नागपूर : एका शासकीय रुग्णालयाच्या वॉर्डात चक्क 'कॅटरिना कैफ' अवतल्याने डॉक्टरांसह तेथील कर्मचारी व पेशंट अवाक झाल्याचे दृष्य पहावयास मिळाले.
पूर्वी शासकीय रुग्णालयात उपचार घेत असताना अनेक रुग्णांचे त्या वॉर्डातील डॉक्टर, परिचारिका, कर्मचारी यांच्यासोबत ऋणानुबंध जुळायचे. रुग्णालयातून सुटी झाल्यावर त्या वॉर्डाला काही भेटवस्तू म्हणून द्यायचे. भिंतीवरील घड्याळ, देवी-देवता किंवा महापुरुषांची प्रतिमांचा समावेश असायचा. वॉर्डमध्ये या वस्तू लावल्यासुद्धा जायच्या. अलीकडे अपघातामुळे एक युवक वॉर्डात महिनाभर उपचारासाठी होता.
बरा होऊन सुटी झाल्यावर जाताना त्याने एक मोठी प्रतिमा डॉक्टरांच्या हाती ठेवली. त्यावर कागदाचे वेष्टण होते. मी गेल्यावर ही प्रतिमा वॉर्डात लावण्याची विनंती केली. या प्रतिमेमुळे वॉर्डात प्रसन्नता येईल, असे म्हणून त्याने निरोप घेतला. डॉक्टरने महापुरुषाची प्रतिमा असेल अशी कल्पना करून कर्मचाऱ्याला वॉर्डाच्या दर्शनी भागात लावण्यास सांगितले. पण प्रतिमेचे वेष्टण काढताच तो दचकला. ती प्रतिमा दुसऱ्या कुणाची नसून कॅटरीना कैफची होती.