"त्या" विमानप्रवाशांना विलगीकरणात ठेवा, आरोग्यमंत्री तानाजी सावंतांनी स्पष्टच सांगितलं
By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2022 12:17 PM2022-12-22T12:17:29+5:302022-12-22T12:19:05+5:30
कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता लोकांनी बचावासाठी बूस्टर डोस घ्यावा, असं तज्ज्ञांनी म्हटलं.
चीनसह अनेक देशांत कोरोनाचे वाढते रुग्ण पाहता केंद्र सरकार सतर्क झाले आहे. आरोग्य मंत्रालयाने बुधवारी कोविड स्थितीचा आढावा घेण्यासाठी उच्चस्तरीय बैठकीचं आयोजन केले आहे. गर्दीच्या ठिकाणी लोकांना मास्क घालण्याचा सल्ला देण्यात आला आहे. विमानतळावर परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची रॅपिड टेस्ट सुरू आहे. परदेशातून येणाऱ्यांची कोविड चाचणी होणार आहे. ही चाचणी पॉझिटिव्ह आल्यानं कोविड प्रोटोकॉलचं पालन करावं लागेल. राज्याच्या हिवाळी अधिवेशनातही हा मुद्दा समोर आल्यानंतर आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत. तसेच, नागरिकांना घाबरुन न जाण्याचं आवाहनही त्यांनी केलंय.
कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता लोकांनी बचावासाठी बूस्टर डोस घ्यावा, असं तज्ज्ञांनी म्हटलं. आत्तापर्यंत कोणतेही निर्बंध लादण्यात आलेले नाहीत, परंतु प्रतिबंधात्मक उपायांवर जोरदार काम सुरू झाले आहे. ज्या लोकांना आधीच कोणताही आजार आहे किंवा वृद्ध आहेत त्यांनी विशेषतः त्याचे पालन करावे. आरोग्य मंत्रालय दर आठवड्याला कोविड संदर्भात आढावा बैठक घेणार आहे. राज्यातही या संदर्भात शासकीय यंत्रणा सज्ज झाल्याची माहिती मंत्री तानाजी सावंत यांनी दिली.
यासंदर्भात विदेशातून येणाऱ्या प्रत्येक प्रवाशांची थर्मल टेस्टींग घेण्याचे निर्देश विमानतळ अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यातच, चीनवरुन येणाऱ्या प्रत्येक प्रवाशांची थर्मल टेस्टींग करा आणि त्या टेस्टींगमध्ये काही डिफेक्ट वाटल्यास त्या प्रवाशांना आयसोलेशनमध्ये टाका, असे निर्देश संबंधित यंत्रणांना देण्यात आल्याची माहिती सार्वजनिक आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी दिली. महाराष्ट्रातील लोकांची इम्युनिटी चांगली आहे, त्यामुळे कोरोना संदर्भातील वृत्त वाचून घाबरुन जायचं कारण नाही. प्रशासन, शासन आणि आपली यंत्रणा पूर्णपणे सक्षम आहे. मास्क बंधनकारक करायचा का नाही, याबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतर निर्णय घेण्यात येईल, असेही मंत्री सावंत यांनी यावेळी स्पष्ट केले.
दरम्यान, तालुका पातळीपासून ते महानगर पालिकेतील सर्व आरोग्य यंत्रणांना खबरदारी घेण्याच्या आणि सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. तर आरोग्य भरती करण्यावरही आमचा भर आहे, असंही त्यांनी सांगितलं.