जीपीएस घड्याळ ठेवून सफाई कर्मचारी गायब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2019 09:34 PM2019-02-27T21:34:14+5:302019-02-27T21:37:52+5:30
जीपीएस घड्याळीमुळे कामावर असेल तरच वेतन निघेल. कामावर नसतानाही वेतन उचलून फसवेगिरी करणाऱ्या स्वच्छता कर्मचाऱ्यांना चाप बसणार असल्याचा दावा महापालिका प्रशासनाकडून हा प्रकल्प राबविताना करण्यात आला होता. मात्र घड्याळीच्या ट्रॅकिंगवर कर्मचाऱ्यांनी नवा पर्याय शोधला आहे. कामाच्या ठिकाणी घड्याळ ठेवून गैरहजर असूनही हजेरी लावली जात आहे. बुधवारी वाठोडा घाट परिसरात असाच प्रकार उघडकीस आला. कामावर गैरहजर असताना सहा सफाई कर्मचाऱ्यांनी कामाच्या ठिकाणी घड्याळी ठेवून हजेरी लावल्याचा प्रकार उघडकीस आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जीपीएस घड्याळीमुळे कामावर असेल तरच वेतन निघेल. कामावर नसतानाही वेतन उचलून फसवेगिरी करणाऱ्या स्वच्छता कर्मचाऱ्यांना चाप बसणार असल्याचा दावा महापालिका प्रशासनाकडून हा प्रकल्प राबविताना करण्यात आला होता. मात्र घड्याळीच्या ट्रॅकिंगवर कर्मचाऱ्यांनी नवा पर्याय शोधला आहे. कामाच्या ठिकाणी घड्याळ ठेवून गैरहजर असूनही हजेरी लावली जात आहे. बुधवारी वाठोडा घाट परिसरात असाच प्रकार उघडकीस आला. कामावर गैरहजर असताना सहा सफाई कर्मचाऱ्यांनी कामाच्या ठिकाणी घड्याळी ठेवून हजेरी लावल्याचा प्रकार उघडकीस आला.
वाठोडा भागात स्वच्छता कर्मचारी कामवार हजर राहात नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहे. याची दखल घेत परिवहन समितीचे सभापती बंटी कुकडे यांनी वाठोडा घाट येथील सफाई कर्मचाऱ्यांच्या ठिय्याला भेट दिली असता हा धक्कादायक प्रकार निदर्शनास आला. हजर नसतानाही ड्युटीवर ,हजर असल्याचे दर्शविण्यासाठी कामाच्या ठिकाणी सहा घड्याळी आढळून आल्या. कुकडे यांनी या घड्याळी ताब्यात घेऊन यासंदर्भात महापालिका आयुक्त अभिजित बांगर याना त्यांनी अवगत केले.
सफाई कर्मचारी कामावर हजर नसतानाही वेतन उचलत असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी कर्मचाऱ्यांना जीपीएस घड्याळी द्याव्यात यासाठी कंपनीला वर्षाला २. ३४ कोटी दिले जातात. परंतु यामुळे फारसा फरक पडलेला नाही. तसेच ही यंत्रणा राबविताता तांत्रिक अडचणी येत असून कामावर हजर आहे की नाही याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला तर काही सफाई कर्मचाऱ्यांचे लोकेशन व्यवस्थित मिळत नसल्याने या प्रकल्पावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
महापालिकेतील कार्यरत ८०५६ सफाई कर्मचाऱ्यांना तसेच निरीक्षक, कनिष्ठ निरीक्षक मुख्यालयातील विभाग प्रमुखांना या घड्याळी देण्यात आल्या. मनपात सध्या सुमारे ८ हजारांवर सफाई कर्मचारी कार्यरत आहेत. यात ४५०० ऐवजदार, ३६ निरीक्षक, १० कनिष्ठ निरीक्षक व १३० सुपरवायझरचाही समावेश आहे. प्रत्येक सफाई कर्मचाऱ्याला सुमारे ५०० मीटरचा रस्ता स्वच्छ करावा लागतो. या कर्मचाऱ्यांवर सफाई निरीक्षक लक्ष ठेवतात. कचरा जमा होणाऱ्या जागेची तपासणी व वस्त्यांतील स्वच्छतेची तपासणी करण्यासोबतच रस्ते, रस्त्याशेजारील भाग व सार्वजनिक परिसरातील स्वच्छतेची तपासणीही निरीक्षकांना करावी लागते. परंतु जीपीएस यंत्रणेकडून अपेक्षित मदत होत नसल्याच्या तक्रारी आहेत.
वेतनप्रणालीशी जोडले नाही
जीपीएस घड्याळ देण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांचे हजेरीशी वेतन जोडणे अपेक्षित होते. सफाई कर्मचारी अनुपस्थित असल्यास वेतन कपात अपेक्षित होती.मात्र अजूनही ही प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. झोन कार्यालयाकडून याला अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही. यात तांत्रिक अडचणी असल्याने ही प्रक्रिया थंडावली आहे.