नागपूर जिल्ह्यात पावणेपाच लाख हेक्टरवर खरिपाचे नियोजन; यंदा तुरीवर भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 07:00 AM2021-05-05T07:00:00+5:302021-05-05T07:00:07+5:30

Nagpur News नागपूर जिल्ह्याच्या कृषी विभागाने यंदाच्या खरीप हंगामासाठी ४ लाख ७५ हजार हेक्टरवर नियोजन केले आहे. कापूस आणि तूर या नगदी पिकांवर यंदा नियोजनात भर देण्यात आला आहे.

Kharip planning on five and a half lakh hectares in Nagpur district | नागपूर जिल्ह्यात पावणेपाच लाख हेक्टरवर खरिपाचे नियोजन; यंदा तुरीवर भर

नागपूर जिल्ह्यात पावणेपाच लाख हेक्टरवर खरिपाचे नियोजन; यंदा तुरीवर भर

Next
ठळक मुद्दे सोयाबीनचे हेक्टरी उत्पादन वाढविण्याचे प्रयत्न करणार

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : जिल्ह्याच्या कृषी विभागाने यंदाच्या खरीप हंगामासाठी ४ लाख ७५ हजार हेक्टरवर नियोजन केले आहे. कापूस आणि तूर या नगदी पिकांवर यंदा नियोजनात भर देण्यात आला आहे. मात्र, गतवर्षीचा अनुभव लक्षात घेता सोयाबीनचे क्षेत्र घटविले आहे.

नागपूर जिल्ह्याचे पीक लागवडीलायक क्षेत्र ६ लाख ६६ हजार २१२ हेक्टर आहे. त्यापैकी ४ लाख ७९ हजार २०९ हेक्टर क्षेत्र खरिपासाठी योग्य आहे. यंदा पडीक जमीन वगळता ४ लाख ७५ हजार हेक्टर क्षेत्रावर कृषी विभागाने नियोजन आखले आहे. जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान १,०३७ मिमी आहे. गतवर्षी पाऊस जेमतेम असला तरी यंदा पाऊस समाधानकारक राहणार असल्याचा वेधशाळेचा अंदाज आहे.

तृणधान्य नियोजन

यावर्षी तृणधान्यासाठी १ लाख ८ हजार हेक्टरवर नियोजन केले आहे. ज्वारी आणि मक्याच्या तुलनेत भाताचे पीक अधिक घेतले जाते. यावर्षी भातासाठी ९६ हजार हेक्टर खरिपाचे नियोजन आहे. गतवर्षी ९५ हजार ७०० हेक्टरवर नियोजन करण्यात आले होते. यावर्षी ज्वारी ४ हजार हेक्टर, तर मका ८ हजार हेक्टरचे नियोजन आहे.

कडधान्य नियोजन

यावर्षी तुरीच्या उत्पादनावर कृषी विभागाने अधिक भर दिला आहे. कडधान्यासाठी ८४ हजार हेक्टरवर नियोजन असून, तुरीच्या लागवडीला ६५ हजार हेक्टर नियोजन करून प्राधान्य दिले आहे. गतवर्षी हे क्षेत्र ५१ हजार हेक्टर असूनही शेतकऱ्यांना तुरीचे भरपूर उत्पादन झाले होते. हेक्टरी सरासरी १४.२८ क्विंटल उतारी पडली होती. यंदा हेक्टरी १६ क्विंटलचे लक्ष्य ठेवले आहे. यासोबतच मूग ८०० हेक्टर, उडीद ६०० हेक्टर, तर इतर कडधान्यासाठी ५०० हेक्टरचे नियोजन आहे.

सोयाबीन क्षेत्रात घट

जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी गतवर्षी सोयाबीनचा पेरा मोठ्या प्रमाणावर केला होता. १ लाख २ हजार ३०० हेक्टरवर पेरा असला तरी उत्पन्न मात्र घटले. सरासरी ३.६१ क्विंटल उत्पादन झाल्याने यंदा कृषी विभागाने ८५ हजार हेक्टरची आखणी सोयाबीनसाठी केली आहे. ऐन काढणीच्या वेळी आलेला पाऊस, घटलेली उत्पादकता यामुळे शेतकऱ्यांचे सोयाबीनमध्ये नुकसान झाले. नगदी पीक असलेल्या कापसाचे क्षेत्र यंदा १०० हेक्टरने वाढवून कापूस २,१३ हजार हेक्टर आखले आहे.

 

Web Title: Kharip planning on five and a half lakh hectares in Nagpur district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :agricultureशेती