नागपुरात चिमुकल्याचे अपहरण करून हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2018 11:50 PM2018-04-05T23:50:43+5:302018-04-05T23:50:55+5:30
गेल्या १० दिवसांपासून बेपत्ता असलेल्या चिमुकल्याचा मृतदेह पोत्यात मिळाला. वंश ओमप्रकाश यादव (वय ८ वर्षे) असे मृत बालकाचे नाव आहे. तो प्रतापनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खामला जुना वस्तीत राहत होता. क्षुल्लक कारणावरून वंशचे त्याच्या अल्पवयीन मावसभावानेच अपहरण करून हत्या केल्याचे उघड झाल्याने उपराजधानीत खळबळ उडाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गेल्या १० दिवसांपासून बेपत्ता असलेल्या चिमुकल्याचा मृतदेह पोत्यात मिळाला. वंश ओमप्रकाश यादव (वय ८ वर्षे) असे मृत बालकाचे नाव आहे. तो प्रतापनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खामला जुना वस्तीत राहत होता. क्षुल्लक कारणावरून वंशचे त्याच्या अल्पवयीन मावसभावानेच अपहरण करून हत्या केल्याचे उघड झाल्याने उपराजधानीत खळबळ उडाली आहे.
ओमप्रकाश यादव हे पत्नी गौरी, मुलगी वंशिका आणि मुलगा वंशसह खामला जुनी वस्तीत राहतात. त्यांच्याकडे गाई, म्हशी असून ते दुधाचा व्यवसाय करतात. आर्थिक स्थिती योग्य नसल्यामुळे ओमप्रकाश यांच्यासह पत्नी गौरीही दूध वाटपासाठी घरोघरी फिरतात. वंशिका ही सहाव्या तर वंश हा खामल्यातील सिंधी हिंदी हायस्कूलमध्ये तिसऱ्या वर्गात शिकत होता. २७ मार्चला सकाळी १० वाजता वंशचे वडील ओमप्रकाश नेहमीप्रमाणे दूध विकण्यासाठी घरून निघून गेले तर आईसुद्धा ११ वाजता बाहेर पडली. त्यावेळी वंश हा घरासमोरील मनपाच्या मैदानावर खेळत होता. तो दुपारी १२ वाजता शाळेत जायचा. दुपारी १२.३० ला वंशिका शाळेतून घरी आली. तिला वंशचे दप्तर घरी दिसले मात्र तो दिसला नाही. दुपारी १ वाजता आईवडील घरी आले. दप्तर घरी होते. मात्र वंश घरी नसल्यामुळे त्यांनी शाळेत चौकशी केली. तो शाळेत गेलाच नसल्याचे स्पष्ट झाल्याने नातेवाईकांना फोन करून विचारपूस केली. कुठेच पत्ता लागत नसल्याने ओमप्रकाश आणि गौरी यांनी परिसरात शोधाशोध केली. नंतर प्रतापनगर ठाण्यात वंश बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली.
२७ मार्चला वंश अचानक बेपत्ता झाला होता. त्याचे अपहरण झाले असावे, असा संशय पालकांनी पोलिसांकडे नोंदविलेल्या तक्रारीत व्यक्त केला होता. पोलिसांनी अपहरणाची नोंद केली, मात्र फारसा गांभीर्याने तपास केला नाही. मुलांचे आईवडील आणि या भागातील सामाजिक कार्यकर्ते चिमुकल्या वंशचा गेल्या १० दिवसांपासून शोध घेत होते. गुरुवारी सकाळी ७ वाजता सोेनेगाव तलावाच्या कोरड्या भागातील कचऱ्याच्या ढिगाऱ्यात एका पोत्यातून दुर्गंधी येत असल्याने आजूबाजूच्यांनी चौकशी केली. पोत्यात बालकाचा मृतदेह असल्याचे लक्षात येताच पोलिसांना कळविण्यात आले.
ठाणेदार पांडे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. बालकाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत होता. त्याच्या शरीरावरचे कपडेही फाटले होते. पोलिसांनी लगेच श्वानपथक तसेच ठसे तज्ज्ञांना बोलवून घेतले.
माहिती कळताच गुन्हे शाखेचे पथकही पोहोचले. दरम्यान, शहरातील कोणत्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत बालकाच्या बेपत्ता होण्याची नोंद आहे, त्याची सोनेगाव पोलिसांनी माहिती घेतली. प्रतापनगर ठाण्यातून २७ मार्चला वंश बेपत्ता झाल्याची माहिती पुढे आली. त्यामुळे पोलिसांनी वंशच्या नातेवाईकांना घटनास्थळी बोलवून घेतले. त्यानंतर या भागातील सामाजिक कार्यकर्ते वंशच्या नातेवाईकांना घेऊन तेथे पोहोचले. वंशचा मृतदेह पाहून त्याचे आईवडील बेशुद्धच पडले. शुद्धीवर आल्यानंतर त्यांची एकच आक्रोश केला.
अन् धागा मिळाला
वंशचा मृतदेह ज्या पोत्यात भरून होता, ते पोते शेण फेकण्यासाठी यादव परिवार वापरत होता. वंशची आई आणि बहीण तसेच बहिणीचा परिवार बाजूलाच राहत होता. पोलिसांनी माहिती देताच वंशच्या वडिलांसोबत त्यांचे साडभाऊ अनिल यादव (आरोपीचे वडील) देखिल तलावाच्या काठावर पोहचले. तेसुद्धा दूधविक्रीचा व्यवसाय करतात. वंशचा मृतदेह फेकण्यासाठी वापरण्यात आलेले पोते आणि तोंडावर बांधलेली दोरी घरचीच असल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. त्यामुळे गुन्हे शाखा पोलिसांनी त्या भागातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता वंशचा मावसभाऊ (आरोपी) अॅक्टीव्हावर हे पोते २७ मार्चला दुपारी खामल्यातून सोनेगाव तलावाकडे नेताना आढळला. परिणामी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. काही मिनिटातच त्याने हत्येची कबुली दिली.
क्रौर्य आणि निर्ढावलेपणा
वंश आणि आरोपीचे पालक रोज निघालेले शेण वृंदावन गार्डनच्या बाजूला नेऊन तेथे गोवºया थापतात. या गोवऱ्या नंतर ते विकतात. घटनेच्या दिवशी आरोपीने वंशला आपल्यासोबत गोवऱ्या आणायला अॅक्टीव्हावर बसवून नेले. सोबत प्लास्टिकचे पोते आणि दूध काढताना जनावराच्या पायाला बांधण्यासाठी वापरली जाणारी दोरी होती. गोवऱ्या पोत्यात भरतेवेळी वंशच्या हातून पोते सटकले. त्यामुळे आरोपीने त्याला शिवीगाळ केली. वंशनेही त्याला प्रत्युत्तर दिले. त्यामुळे चिडलेल्या आरोपीने पोते बांधण्यासाठी नेलेल्या दोरीने वंशचा गळा आवळून त्याला ठार मारले. नंतर गोवऱ्याऐवजी वंशचा मृतदेह पोत्यात भरला आणि अॅक्टीव्हावर ठेवून सोनेगाव तलावात फेकून दिला. त्यानंतर तो घरी आला काही झालेच नाही, अशा अविर्भावात फिरू लागला.
वंशचे आईवडील त्याचा शोध घेत असताना आरोपी त्यांच्यासोबतच फिरत होता. तब्बल १० दिवस तो वंशला शोधण्याचे नाटक करीत होता. विशेष म्हणजे, वंशचा मृतदेह मिळाल्यानंतर पोलिसांनी सुरू केलेल्या चौकशीलाही तो सामोरे गेला. त्याचे हे कृत्य आणि निर्ढावलेपणा एखाद्या थंड डोक्याच्या सराईत गुन्हेगारालाही लाजविणारे ठरले. दुसरीकडे वंशची हत्या त्याने केल्याचे ऐकून वंशिका बेशुद्ध पडली. आपला मावसभाऊ असे करूच कसा शकतो, असा प्रश्न निरागस वंशिकाला पडला आहे. दरम्यान, आरोपी १७ वर्षांचा असल्याने पोलीस त्याला अटक करू शकत नाही. त्यामुळे चौकशीनंतर त्याची सुधारगृहात रवानगी केली जाणार आहे.