उपराजधानीत मूत्रपिंड प्रत्यारोपणाची शंभरीकडे वाटचाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2020 12:47 PM2020-02-18T12:47:10+5:302020-02-18T12:49:29+5:30
सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल हे मोठ्या संख्येत मूत्रपिंड प्रत्यारोपण करणारे राज्यात पहिले रुग्णालय ठरले आहे.
सुमेध वाघमारे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दोन्ही मूत्रपिंड निकामी झालेल्या रुग्णांसाठी मेडिकलशी संलग्न असलेल्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आशेचे किरण ठरले आहे. या रुग्णालयात आतापर्यंत ६३ मूत्रपिंड प्रत्यारोपण झाले असून, शंभरीकडे वाटचाल सुरू आहे. विशेष म्हणजे, शासकीय रुग्णालयांमध्ये एवढ्या मोठ्या संख्येत मूत्रपिंड प्रत्यारोपण करणारे राज्यात हे पहिले रुग्णालय ठरले आहे.
भारतात दरवर्षी मूत्रपिंड निकामी होणाऱ्या २.२ लाख नव्या रुग्णांची भर पडत आहे, ज्यामुळे दरवर्षी ३.४ कोटी डायलिसिसची अतिरिक्त मागणी निर्माण होत आहे. या विकारांच्या उद्भवाशी वयाचा फारसा संबंध आढळून येत नाही, कारण किशोरवयीन मुलांमध्ये तसेच बालकांमध्येही त्यांचे प्रमाण सारख्या वेगाने वाढत आहे. तज्ज्ञानुसार, मूत्रपिंड विकारामुळे येणाºया मृत्यूचे प्रमाण २०१६ मध्ये अकराव्या क्रमांकावर होते. या विकारावर मूत्रपिंड प्रत्यारोपण हाच एकमेव पर्याय आहे. याची दखल घेत नागपूर मेडिकलने सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये शासकीय रुग्णालयांमध्ये पहिले मूत्रपिंड प्रत्यारोपण केंद्र सुरू केले. ९ फेब्रुवारी २०१६ पहिल्या प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वी पार पडली. त्यानंतर ते आतापर्यंत ६३ मूत्रपिंड प्रत्यारोपण होऊन रुग्णांना नवजीवन मिळाले आहे.
गेल्या वर्षात २१ प्रत्यारोपण
सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील मूत्रपिंड प्रत्यारोपण केंद्रात २०१६ मध्ये नऊ, २०१७ मध्ये १७, २०१८ मध्ये १३ तर २०१९ मध्ये २१ प्रत्यारोपण झाले, तर या वर्षात आतापर्यंत तीन प्रत्यारोपण झाले आहे. यात सर्वाधिक मूत्रपिंडदान आईने दिले आहेत. त्याची संख्या ३२ आहे. याशिवाय, वडिलांकडून १०, पत्नींकडून सहा, पतीकडून एक, बहिणीकडून तीन, भावाकडून दोन, मोठ्या वडिलांकडून एक तर ब्रेन डेड म्हणजे मेंदू मृत व्यक्तीकडून आठ मूत्रपिंड दान झाले आहे. नुकतेच झालेले ६३ वे मूत्रपिंड शाहीना परवीन या ३७ वर्षीय आईने आपल्या १४ वर्षीय मुलगा मोहम्मद नुमान याला दिले आहे.
प्रत्यारोपणातील सहभागी चमू
मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रिया गुंतागुंतीची असते. यामुळे प्रत्येकाचा सहभाग महत्त्वाचा ठरतो. अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा यांच्यासह विशेष कार्य अधिकारी डॉ. मिलिंद फुलपाटील, मूत्रपिंड प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉ. संजय कोलते, मूत्रपिंड तज्ज्ञ डॉ. समीर चौबे, नेफ्रोलॉजी विभागाच्या प्रमुख डॉ. चारुलता बावनकुळे, यूरोलॉजी विभागप्रमुख डॉ. धनंजय सेलूकर, डॉ. रितेश बनोदे, डॉ. पीयूष किंमतकर, डॉ. वंदना आदमने, डॉ. आशुतोष जयस्वाल, डॉ. वली, डॉ. मेहराज शेख व डॉ. प्रतीक लढ्ढा यांच्यासह इतरही विभागप्रमुख,परिचारिका व कर्मचाऱ्यांचा समावेश असतो.