आॅटोचालकाचे अपहरण करून हत्या
By admin | Published: April 18, 2017 01:44 AM2017-04-18T01:44:31+5:302017-04-18T01:44:31+5:30
अनैतिक संबंधातून निर्माण झालेल्या वादाचे पर्यवसान एका तरुणाचे अपहरण करून त्याची निर्घृण हत्या करण्यात झाले.
मृतदेह विहिरीत फेकला : आठ दिवसांपासून होता बेपत्ता
नागपूर : अनैतिक संबंधातून निर्माण झालेल्या वादाचे पर्यवसान एका तरुणाचे अपहरण करून त्याची निर्घृण हत्या करण्यात झाले. निकेश विजय साठवणे (वय २५) असे मृताचे नाव असून, नंदनवन पोलिसांनी याप्रकरणी एकाला अटक केली.
आॅटोचालक असलेला निकेश वाठोड्यातील पवनशक्तीनगर येथे राहत होता. गेल्या ९ एप्रिलपासून बेपत्ता होता.
त्याचा ठिकठिकाणी शोध घेऊनही तो आढळला नाही. त्यामुळे दुसऱ्या दिवशी त्याची आई शालू विजय साठवणे (वय ३८) यांनी नंदनवन ठाण्यात ‘मिसिंग‘ची तक्रार नोंदवली. पालक आणि पोलीस निकेशचा शोध घेत असतानाच, काही जणांनी वाठोड्यातीलच गोपाल बिसेनसोबत ९ एप्रिलच्या रात्री निकेश जातना दिसल्याचे सांगितले. ही माहिती निकेशच्या नातेवाईकांनी पोलिसांना सांगितली. त्यावरून पोलिसांनी गोपाल आणि त्याची मैत्रीण जया शर्मा यांना रविवारी चौकशीसाठी ठाण्यात बोलावले. बरीच विचारपूस करूनही आरोपींनी निकेशबाबत कसलीही माहिती असल्याचा इन्कार केला.
त्यामुळे पोलिसांनी त्यांना मोकळे केले. मात्र, त्यांच्या संशयास्पद हालचाली पाहून पोलिसांनी सोमवारी सकाळी गोपालला पुन्हा ठाण्यात नेले. चौकशीत त्याने निकेशच्या हत्येची कबुली दिली आणि मृतदेह वाठोड्यातील एका विहिरीत फेकल्याचे सांगितले.
त्यानंतर गोपालसह पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह विहिरीबाहेर काढला. तो निकेश साठवणेचा असल्याचे स्पष्ट झाले. त्याच्या शरीरावर तीक्ष्ण शस्त्राने भोसकल्याच्या खुणा होत्या. मृतदेह रुग्णालयात नेल्यानंतर डॉक्टरांनी निकेशची शस्त्राचे घाव घालून हत्या झाल्याचा अंदाज वर्तविला.
दोन महिन्यांपूर्वीच्या भांडणाचा सूड
आरोपी जया शर्मा हिचे व्यक्तिमत्त्व वादग्रस्त आहे. तिचे आणि निकेशचे दोन महिन्यांपूर्वी अनैतिक संबंधाच्या कारणावरून जोरदार भांडण झाले.
त्यामुळे जयाने आरोपी बिसेन आणि त्याच्या एका मित्राला निकेशची हत्या करण्यासाठी उकसवले. तिने दाखविलेल्या आमिषाला बळी पडून गोपाल आणि त्याच्या एका महाविद्यालयीन विद्यार्थी असलेल्या मित्राने ९ एप्रिलच्या रात्री १० वाजता निकेशला त्याच्या घरून बोलवून नेले. त्यानंतर त्याचे अपहरण करून हत्या करण्यात आली आणि मृतदेह विहिरीत फेकण्यात आला.
हा घटनाक्रम उघड झाल्यानंतर आज रात्री नंदनवनचे पोलीस उपनिरीक्षक जी. ए. गोटके यांनी गोपाल बिसेन, जया शर्मा आणि त्यांच्या एका साथीदाराविरुद्ध दाखल केला. बिसेनला अटक करण्यात आली. जया घराला कुलूप लावून पळून गेली तर महाविद्यालयीन विद्यार्थी असलेला आरोपी दोन दिवसांपासूनच फरार आहे. पोलीस जया आणि त्याचा शोध घेत आहेत.(प्रतिनिधी)