३ मार्चपासून किसान ब्रिगेडची विदर्भात किसान जागृती यात्रा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:07 AM2021-02-24T04:07:30+5:302021-02-24T04:07:30+5:30
नागपूर : देशातील दिल्लीपासून दूर असलेली राज्ये आणि तेथील शेतकरी व सर्वसामान्य जनता दिल्लीतील आंदोलनासोबत आहे. मात्र कोरोनाचा बागुलबुवा ...
नागपूर : देशातील दिल्लीपासून दूर असलेली राज्ये आणि तेथील शेतकरी व सर्वसामान्य जनता दिल्लीतील आंदोलनासोबत आहे. मात्र कोरोनाचा बागुलबुवा दाखवीत रेल्वे आणि सर्व वाहतूक बंद ठेवून सरकार जनतेला आंदोलनापासून दूर ठेवू पाहत आहे. केंद्राने पारित केलेल्या तीन कायद्याची शेतकरी विरोधी बाजू सांगण्यासाठी ३ मार्चपासून किसान ब्रिगेड विदर्भात किसान जनजागृती सायकल यात्रा काढणार आहे.
किसान ब्रिगेडचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष अविनाश काकडे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी किसान ब्रिगेडचे प्रकाश पोहरे प्रामुख्याने उपस्थित होते. काकडे म्हणाले, सिंदखेडराजाहून ही यात्रा प्रारंभ होईल. यात युवक, शेतकरी सहभागी असतील. या काळामध्ये सरकारने राज्यात लॉकडाऊन लावले तरी यात्रा थांबणार नाही, हवे तर सरकारने आम्हाला अटक करावी, असा इशारा त्यांनी दिला. ९० दिवस लोटूनही सरकार कायदे मागे घ्यायला तयार नाही. उलट शेतकऱ्यांची नाकाबंदी करीत आहे. खलिस्तानी व देशद्रोह्यांचे आंदोलन म्हणत बदनाम करीत आहे. ही बाजू सांगण्यासाठी ९०० किलोमीटरचा प्रवास १५ दिवस करत मार्गातील गावांमध्ये जनजागृती केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला आरटीआय कार्यकर्ता मोनित जबलपुरे, निवृत्त सैनिक शेषराव मरोडिया आणि राजू मिश्रा उपस्थित होते.