लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दोन दिवसांवर आलेल्या संक्रांतीमुळे पतंगप्रेमी आनंदले आहेत. पतंग आणि मांजा विक्रीची दुकाने सर्वत्र थाटली असून, दिवसेंदिवस आकाशातही रंगबिरंगी पतंगाची गर्दी वाढत आहे. या आनंदाच्या उत्सवात विघ्न येऊ नये, याकरिता पतंग उडविताना सावधगिरी बाळगण्याची गरज आहे.
पतंग उडविण्याचा मोह लहानापासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांनाच होतो व हा मोह त्यांना टाळताही येत नाही. मात्र, शहरी भागात महावितरणाच्या लघु व उच्च दाब वाहिन्यांचे जाळे पसरलेले असते आणि अनेकदा पतंग उडविताना किंवा कापलेले पतंग विजेच्या तारांवर किंवा खांबांवर अडकतात, अशावेळी ती अडकलेली पतंग काठ्या, लोखंडी सळाखी किंवा गिरगोट यांच्या माध्यमातून काढण्याचा प्रयत्न केला जातो. या प्रयत्नात अनेकदा जिवंत विद्युत तारेला स्पर्श होण्याची शक्यता असल्याने अडकलेली पतंग काढण्याचा प्रयत्न जिवावर बेतू शकतो. संक्रांत हा आनंदाचा उत्सव असून, त्याला गालबोट लागू नये, याकरिता पतंग उडविताना पुरेपूर सावधगिरी बाळगावी, असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे.
बरेचदा अडकलेल्या पतंगीचा मांजा खाली जमिनीवर लोंबकळत असतो, हा मांजा ओढून पतंग काढण्याच्या प्रयत्नातही विजेचा भीषण अपघात होण्याची दाट शक्यता असते. मांजा ओढताना एका तारेवर दुसया तारेचे घर्षण होऊन शॉर्ट सर्कीट होण्याचा, प्रसंगी प्राणांतिक अपघात होण्याचा तसेच वीजपुरवठा खंडित होण्याचा प्रकारही घडू शकतो. सध्या बाजारात धातुमिश्रित मांजा मोठ्या प्रमाणात विक्रीकरिता उपलब्ध आहे, हा मांजा वीजप्रवाही तारांच्या किंवा रोहित्र वा महावितरण यंत्रणेच्या संपर्कात आल्यास त्यातून वीज प्रवाहित होऊन प्राणांतिक अपघाताची शक्यता आहे. दोन दिवसांपूर्वी जिल्ह्यातील उमरेड येथे उच्च दाब वीज वाहिनीवर अडकलेला पतंग काढताना ११ वर्षीय बालकाचा भाजून मृत्यू झाला. यामुळे पालकांनी आपल्या मुलांकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे.
हे लक्षात ठेवा
वीज तारांवर अडकलेली पतंग काढणे जीवघेणे ठरू शकते.
तारांमध्ये अडकलेला मांजा ओढू नये.
अडकलेली पतंग किंवा मांजा काढायला रोहित्रावर चढू नये.
धातुमिश्रित अथवा नायलॉनचा मांजा टाळावा.
वीज तारा असलेल्या परिसरात पतंग उडविणे टाळा.
तारांत अडकलेली पतंग काढण्यासाठी दगडाला दोरा बांधून तारांवर फेकू नये.
पतंग उडविणाऱ्या पाल्यांकडे पालकांनी लक्ष द्यावे.