नागपुरात पोटदुखीला कंटाळून मजुराची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2020 01:22 AM2020-08-08T01:22:12+5:302020-08-08T01:23:27+5:30
पोटदुखीच्या त्रासाला कंटाळलेल्या एका तरुणाने गळफास लावून आत्महत्या केली. शुक्रवारी दुपारी १२.३० च्या सुमारास ही घटना घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पोटदुखीच्या त्रासाला कंटाळलेल्या एका तरुणाने गळफास लावून आत्महत्या केली. शुक्रवारी दुपारी १२.३० च्या सुमारास ही घटना घडली. विष्णू ओंकार वर्मा (वय ३५) असे मृताचे नाव आहे. तो कळमन्याच्या लक्ष्मीनगरात राहात होता. आठ-दहा वर्षांपूर्वी वर्मांने मीना (वय ३२) सोबत प्रेमविवाह केला होता. तो मूळचा छत्तीसगडचा रहिवासी असून मीना आणि विष्णू दोघेही कळमना मार्केटमध्ये हात मजुरीचे काम करत होते. काही दिवसांपासून त्याला पोटदुखीचा त्रास सुरू झाला. त्यात तो दारू प्यायला लागला. शुक्रवारी सकाळपासून वर्मा पोटदुखीची तक्रार करू लागला पत्नीने त्याला पैसे देऊन डॉक्टरकडे जाऊन येण्यास सांगितले. मात्र डॉक्टरकडे जाण्याऐवजी वर्मा दारूच्या भट्टीवर गेला आणि तेथून दारू पिऊन आला. त्यानंतर पत्नीने त्याला जेवण वाढले असता पोट जास्त दुखत असल्यामुळे त्याने जेवणास नकार दिला. त्यामुळे पत्नी मीना गोळी आणण्यासाठी मेडिकल स्टोअर्समध्ये गेली. इकडे वर्माने गळफास लावून घेतला. मीना घरी आली असता पती गळफास लावलेल्या अवस्थेत दिसल्यामुळे तिने शेजाऱ्यांना गोळा करून त्याला खाली उतरवले. ऑटो करून त्याला डॉक्टरकडे नेण्याचा प्रयत्न केला. मात्र तो निपचित झाल्याने मीनाने त्याला पुन्हा घरी आणले. नंतर कळमना पोलिसांना कळविले. उपनिरीक्षक दहिफळे यांनी चौकशी नंतर या घटनेची माहिती विष्णू वर्मा यांच्या छत्तीसगडमध्ये राहणाºया कुटुंबीयांना कळविली. या प्रकरणात पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.