काय सांगता! पत्नीच्या कुंडलीत मंगळ नसल्यानं पती चढला कोर्टाची पायरी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2021 08:45 PM2021-03-04T20:45:49+5:302021-03-04T20:45:49+5:30
Petiotion Rejected by Nagpur Bench of Bombay High Court : लग्न होण्याआधी मुलाच्या कुंडलीतही मंगळ आहे, त्यामुळे भविष्यात अमंगळ गोष्टी घडू नये म्हणून मुलाने मुलीकडच्यांना संबंधित अट घातली होती.
अत्याधुनिक काळात देखील अंधश्रद्धेला बळी पडणारी माणसं असल्याचं जिवंत उदाहरण नागपूरमध्ये आहे. आपल्या पत्नीच्या कुंडलीत मंगळ ग्रह नाही. त्यामुळे आपल्याला पत्नीकडून घटस्फोट घेयाचा आहे, अशी याचिका नागपूरच्या एका व्यक्तीने मुंबई उच्च न्यायालयात केली आहे. याप्रकरणी न्यायालयाने संबंधित व्यक्तीला खडेबोल सुनावले आहेत.
कुंडलीत 'मंगळ' नाही, हे घटस्फोटाचं कारण असू शकत नाही. तसेच कुंडलीत मंगळ नसल्याची बाब लपवणे हा छळ केल्याचा प्रकार नाही, असा निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला आहे. नागपूर कौटुंबिक न्यायालयाचा (फॅमिली कोर्ट) निकाल योग्य असल्याचं सांगत न्या. अतुल चांदूरकर आणि न्या. नितीन सुर्यवंशी यांनी महत्त्वचा निर्णय दिला आहे. तसेच पतीची याचिकाही फेटाळून लावली आहे.
नागपूरच्या दत्तवाडी परिसरात राहणाऱ्या एका ३७ वर्षीय पतीला आपल्या पत्नीच्या कुंडलीत मंगळ नाही, हे कळतं. ही गोष्ट तिने आणि तिच्या घरच्यांनी आपल्यापासून लपवून ठेवली. त्यामुळे घटस्फोट घेण्यासाठी याचिका संबंधित व्यक्तीने मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली होती. या व्यक्तीचे लग्न २००७ साली झालं होतं. त्यावेळी मुलीच्या कुटुंबीयांनी मुलीच्या कुंडलीत 'मंगळ' असल्याची खोटी माहिती दिल्याचा आरोप पतीने लावला होता. लग्न होण्याआधी मुलाच्या कुंडलीतही मंगळ आहे, त्यामुळे भविष्यात अमंगळ गोष्टी घडू नये, म्हणून मुलाने मुलीकडच्यांना संबंधित अट घातली होती. लग्नानंतरचे काही दिवस लोटल्यानंतर पत्नी शांत शांत का राहत आहे, हे जाणून घेण्यासाठी पतीने पत्नीकडे कुंडलीची मागणी केली. मात्र, पत्नीने कागदपत्रे हरवल्याचे खोटे सांगून हे प्रकरण बऱ्याच दिवस झाकून ठेवले. नंतर पुढे पती पत्नीच्या नात्यात खटके वाढत असल्याचं पाहून मुलीच्या वडिलांनी पत्रिका आणून दिली.
पत्रिका पहिल्यानंतर पतीने आणि सासरच्या मंडळीने पत्नीवर आणि तिच्या घरच्यावर फसवणुकीचे आरोप करायला सुरुवात केली. मुलीच्या कुंडलीत मंगळ असल्याची खोटी माहिती देवून आपली फसवणूक केल्याचा आरोप पतीकडून सातत्याने करण्यात आला. यानंतर पतीने हुंड्यासाठी पत्नीचा छळ करायला सुरुवात केली. दरम्यान, पत्नीने मुलीला जन्म दिल्याने सासरच्या मंडळीने अजूनच छळ करायला सुरुवात केली. त्यानंतर संबंधित याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती, अशी माहिती न्यूज १८ लोकमतने दिली आहे.