नागपूर : कोरोनाला हरवून बरे झालेले बहुसंख्य रुग्ण, दुसऱ्या एका रुग्णाला जीवनदान देण्यासाठी पुढे येत असले तरी त्यांची संख्या फारच अल्प आहे. परिणामी, दोन शासकीय व तीन खासगी अशा पाच रक्तपेढ्या मिळून केवळ १२५ प्लाझ्मा बॅग उपलब्ध आहेत. सध्या ज्या पद्धतीने कोरोनाचे रुग्ण वाढत आहे त्या तुलनेत प्लाझ्माचा हा साठा कमी पडण्याची व भविष्यात मोठा तुटवडा पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
कोरोनावरील उपचारात ‘प्लाझ्मा थेरपी’ने एक नवी आशा जागविली आहे. यामुळे स्वत: रुग्णासह, नातेवार्ईकही डॉक्टरांकडे या थेरपीची मागणी करीत आहे. मेडिकलमध्ये दोन शासकीय संस्थांकडून ‘प्लाझ्मा’ थेरपीची ट्रायल जून महिन्यापासून सुरू आहे. तेव्हापासून ‘कन्व्हेलेसेन्ट प्लाझ्मा’ दान करण्याचे आवाहन येथील रक्तपेढी करीत आहे. परंतु आठ महिन्यात मेडिकलच्या रक्तपेढील ४० दाते मिळाले. त्यांच्याकडून आतापर्यंत ८० प्लाझ्माच्या बॅग उपलब्ध झाल्या. सध्या २० बॅग उपलब्ध आहेत. मेयोच्या रक्तपेढीला ३२ दाते मिळाले. यांच्याकडून ६१ प्लाझ्मा बॅग उपलब्ध झाल्या असून सध्या ३३ बॅगचा साठा आहे. खासगी रक्तपेढी असलेल्या लाईफ लाईन रक्तपेढीने आतापर्यंत सर्वाधिक, ‘आरबीडी प्लाझ्मा’च्या १०१० बॅग रुग्णांना दिल्या. सध्या या रक्तपेढीत ५० वर बॅग उपलब्ध आहे. हेडगेवार रक्तपेढीत २५० बॅगचा पुरवठा केला असून १२ बॅगचा साठा आहे. जीवन ज्योती रक्तपेढीच्यावतीने १०१ बॅग रुग्णांना उपलब्ध करून दिल्या असून सध्या १२ बॅग उपलब्ध आहेत.
-शहरातील रक्तपेढ्या व प्लाझ्मा साठा
मेडिकल रक्तपेढी-२०
मेयो रक्तपेढी-३३
लाईफ लाईन रक्तपेढी-५०
हेडगेवार रक्तपेढी-१२
जीवन ज्योती रक्तपेढी-१२
एकूण रुग्णसंख्या-१०९२०५
उपचारानंतर बरे झालेले -१०१४६८
उपचार घेत असलेले -४१३३
एकूण मृत-३६०४
कोट...
दिवाळीनंतर पुन्हा कोरोनाबाधितांची संख्या वाढताना दिसून येत आहे. परंतु कोरोनावर मात करून बरे झालेल्यांकडून ज्या पद्धतीने प्लाझ्मा दान व्हायला हवे ते होत नाही आहे. रुग्णांकडून प्लाझ्माची मागणी सातत्याने वाढत आहे. रक्तपेढीकडून प्लाझ्मा दान करण्याचे आवाहन केले जात आहे.
-डॉ. हरीश वरभे
संचालक, लाईफ लाईन रक्तपेढी