‘नीट’मध्ये लाहिरी बोड्डू ‘टॉप’,अन्वय पानगावकर दुसरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2018 11:46 PM2018-06-04T23:46:16+5:302018-06-04T23:46:32+5:30
वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशासाठी ‘सीबीएसई’तर्फे घेण्यात आलेल्या ‘नीट’चा(नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट) निकाल सोमवारी जाहीर झाला. निकालांमध्ये यंदाही मुलींनीच बाजी मारली असून, जी.एच.रायसोनी विद्यानिकेतनची विद्यार्थिनी लाहिरी बोड्डू हिने उपराजधानीतून अव्वल क्रमांक पटकाविला आहे. लाहिरीपाठोपाठ सेंट पॉल कनिष्ठ महाविद्यालयाचा विद्यार्थी अन्वय पानगावकर याने ६३९ गुणांसह शहरातून द्वितीय स्थान पटकाविले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशासाठी ‘सीबीएसई’तर्फे घेण्यात आलेल्या ‘नीट’चा(नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट) निकाल सोमवारी जाहीर झाला. निकालांमध्ये यंदाही मुलींनीच बाजी मारली असून, जी.एच.रायसोनी विद्यानिकेतनची विद्यार्थिनी लाहिरी बोड्डू हिने उपराजधानीतून अव्वल क्रमांक पटकाविला आहे. तिला ७२० पैकी ६४४ गुण प्राप्त झाले व अखिल भारतीय पातळीवर तिचा २०८ वा क्रमांक आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा विद्यार्थ्यांची टक्केवारी वाढलेली दिसून येत आहे. मागील वर्षी नागपुरातील ४०० च्या आत क्रमांक मिळविता आला नव्हता.
६ मे रोजी ‘नीट’चे आयोजन करण्यात आले होते. शहरातील परीक्षा केंद्रांवर रविवारी २० हजारांहून अधिक परीक्षार्थी सहभागी झाले होते. लाहिरीपाठोपाठ सेंट पॉल कनिष्ठ महाविद्यालयाचा विद्यार्थी अन्वय पानगावकर याने ६३९ गुणांसह शहरातून द्वितीय स्थान पटकाविले. तर डॉ.बाबासाहेब आंबेडकर विज्ञान महाविद्यालयाचा विद्यार्थी शार्दुल खंते हा ६३७ गुणांसह तिसऱ्या स्थानी राहिला.
‘नीट’मध्ये विद्यार्थ्यांना भौतिकशास्त्र व रसायनशास्त्राच्या पेपरमध्ये अडचण जाणवली. विशेषत: भौतिकशास्त्राचा पेपर हा आकडेमोडीमुळे लांबलचक व कठीण वाटला होता. याचा परिणाम ‘नीट’मध्ये जाणवला. ‘नीट’च्या निकालांमध्ये शिवाजी विज्ञान महाविद्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर विज्ञान महाविद्यालय, सेंट पॉल कनिष्ठ महाविद्यालय यांच्यात चुरस दिसून आली.
हे आहेत ‘टॉपर्स’
१ लाहिरी बोड्डू ६४४ जी.एच.रायसोनी विद्यानिकेतन
२ अन्वय पानगावकर ६३९ सेंट पॉल कनिष्ठ महाविद्यालय
३ शार्दुल खंते ६३७ डॉ.आंबेडकर महाविद्यालय
४ सोहम व्यवहारे ६२८ सेंट पॉल कनिष्ठ महाविद्यालय
५ राहुल बजाज ६२० सेंट पॉल कनिष्ठ महाविद्यालय
६ रिशिका मोदी ६१४ सेंट पॉल कनिष्ठ महाविद्यालय
७ नंदिता गावंडे ६०९ शिवाजी विज्ञान महाविद्यालय
८ अनमोल अरोडा ६०१ सेंट पॉल कनिष्ठ महाविद्यालय
९ मानव खळतकर ५९३ शिवाजी विज्ञान महाविद्यालय
१० सुहानी जैन ५९२ -
सरावातूनच मिळाले यश : लाहिरी बोड्डू
शहरातून प्रथम आलेल्या लाहिरी बोड्डू हिने अपेक्षेनुरूप यश मिळाल्याचे सांगितले. गेले दोन वर्ष मी नियमित अभ्यासावर भर दिला होता. अभ्यासाचा जास्त तणावदेखील घेतला नव्हता. मात्र दररोज तीन ते चार तास अभ्यास सुरू होता. विशेषत: ‘ए़नसीईआरटी’च्या पुस्तकांतून अभ्यास केला, सोबतच नियमित सराव सुरूच होता. अखेरच्या दिवसांत पेपर्स सोडविण्यावर लक्ष केंद्रित केले. पुढे जाऊन मला दिल्ली येथील ‘एम्स’मध्ये प्रवेश घ्यायचा आहे, असे लाहिरीने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. बारावीत तिला ९१.६० टक्के गुण होते. आपल्या यशाचे श्रेय तिने वडील श्रीनिवास राव बोड्डू व आई उमादेवी बोड्डू यांना दिले.
‘नीट’मध्ये ‘सेंट पॉल’चा दबदबा
वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशासाठी ‘सीबीएसई’तर्फे घेण्यात आलेल्या ‘नीट’चा(नॅशनल एलिजिबिलीटी कम एन्ट्रन्स टेस्ट) निकाल सोमवारी जाहीर झाला. यंदा निकालांमध्ये सेंट पॉल कनिष्ठ महाविद्यालयाचा दबदबा दिसून आला. पहिल्या १० गुणवंतांपैकी ५ जण याच महाविद्यालयाचे आहेत हे विशेष.
अन्वय पानगावकर याने ७०० पैकी ६३९ गुण मिळवत उपराजधानीतून दुसरा क्रमांक पटकाविला आहे. त्याचा अखिल भारतीय पातळीवर २६४ वा क्रमांक आहे. याशिवाय सोहम व्यवहारे (६२८), राहुल बजाज (६२०), रिशीका मोदी (६१४), अंशुल पान्चेल (६१३), अनमोल अरोडा (६०१), संकल्प चिमड्यालवार (५८४) यांनीदेखील चमकदार कामगिरी केली आहे. महाविद्यालयातील १२८ विद्यार्थ्यांनी ४०१ ते ६३८ पर्यंत गुण मिळविले आहेत. संस्थेचे संचालक डॉ.राजाभाऊ टांकसाळे, प्राचार्य देवांगना पुंडे, जितेंद्र मूर्ती यांनी गुणवंताचा सत्कार केला.