सुनील वेळेकर ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: विदर्भाचे पंढरपूर असलेल्या धापेवाडा येथे बुधवारी आषाढी पौर्णिमेच्या द्वितीयेला विठ्ठलाच्या दर्शनासाठी भक्तांचा महासागर उसळला. ‘विठ्ठल विठ्ठल, जय हरी विठ्ठल’च्या जयघोषाने संपूर्ण धापेवाडा नगरी दुमदुमून गेली. बुधवारी पहाटे ५.३० वाजता संस्कार भारतीच्या अध्यक्षा कांचनताई नितीन गडकरी यांच्या हस्ते विठूरायाची महापूजा व अभिषेक संपन्न झाला. त्यानंतर मंदिराचे दरवाजे भाविकांसाठी खुले करण्यात आले. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ. राजीव पोतदार, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष रमेश मानकर, अरुणा मानकर, श्री विठ्ठल रुक्मिणी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष रुद्रप्रतापसिंह पवार, सचिव आदित्यप्रतापसिंह पवार, भानुप्रतापसिंह पवार, कोलबास्वामी मठाचे मठाधिपती श्रीहरी महाराज वेळेकर, बाबा कोढे, दिलीप धोटे, माजी सरपंच मनोहर काळे, राजेश शेटे, गोविंदा शेटे, शेखर ठाकरे व गावकरी उपस्थित होते. दरम्यान दुपारी राज्याचे ऊर्जामंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी धापेवाडा येथे जाऊन विठ्ठलाचे दर्शन घेतले.आषाढी पौर्णिमेला पंढरपूरचा पांडुरंग धापेवाड्यात अवतरतो अशी आख्यायिका आहे. त्याप्रमाणे शुक्रवारी रात्री १२ वाजता धापेवाड्यात पांडुरंगाचे आगमन झाले. सुमारे २७५ वर्षांपासूनचा इतिहास असलेल्या या यात्रेत दरवर्षीप्रमाणे यंदाही भक्तांनी लाखोच्या संख्येत हजेरी लावली. पांढरे धोतर-बंगाली परिधान करून, डोक्यावर भगवी टोपी घालून, हातात टाळ-मृदंग घेऊन पालख्यांसोबत जय हरी विठ्ठलच्या गजरात वारकरी पांडुरंगाच्या नामस्मरणात तल्लीन होऊन नाचत होते. विविध वेशभूषा करून आलेली भजन मंडळी यात्रेकरूंना आकर्षित करीत होते. लहान-मोठ्यापासून सर्व विठूरायाच्या भक्तीत दंग झाले होते. यात्रेत मध्यप्रदेश, विदर्भ व सुरत येथून भाविक दर्शनाला आले होते. सोमवारी सायंकाळपर्यंत येथे शेकडो पालख्या, दिंड्या दाखल झाल्या. चंद्रभागेच्या पात्रातून मार्गक्रमण करत असताना नदीच्या पात्रातही वारकऱ्यांचा मेळा जमला होता. सकाळपासून सायंकाळपर्यंत दोन लाखापेक्षा जास्त भाविकांनी पांडुरंगाचे दर्शन घेतले. यात्रेच्या यशस्वीतेसाठी स्वयंभु श्री विठ्ठल रुक्मिणी देवस्थान ट्रस्टचे सचिव आदित्यप्रतापसिंह पवार, भानुप्रतापसिंह पवार, कृष्णप्रतापसिंह पवार, शंकर ठाकरे, विनोद मेश्राम, शीतल सवाईतुल, मारोती धोटे, अनिल डोईफोडे, दीपक पराते, मंगेश धोटे, प्रवीण मेश्राम, अनिकेत वाघ यांनी परिश्रम घेतले.
रात्रभर जागरणविठ्ठल भक्तांमध्ये संत रघुसंत महाराज, संत मकरंदपुरी महाराज, संत वारामाय व आखुंजी बाबा यांचे देवस्थान येथे आहेत. या सर्व देवस्थानातील दिंड्या तसेच विठ्ठलाच्या दर्शनासाठी आलेल्या दिंड्या रात्री बाजार चैकात एकत्र येतात. रात्रभर ढोलकी व झांजेच्या आवाजाने संपूर्ण गाव दुमदुमून निघते. दिंड्यांवर गावकरी लाह्यांचा वर्षाव करतात. सारे गाव या दिवशी रात्रभर जागरण करते. रात्री ७ ते पहाटे ५ पर्यंत या दिंड्या गावभ्रमण करत पुन्हा विठ्ठलाच्या मंदिरात पोहोचतात. या दिंड्यांसाठी दूरवरून भाविक येतात.