निवडणूक प्रक्रियेसाठी लालपरी सज्ज, महामंडळाकडून २४५ बसेसचे नियोजन
By नरेश डोंगरे | Published: April 13, 2024 06:56 PM2024-04-13T18:56:00+5:302024-04-13T18:57:37+5:30
लोकसभा निवडणूकीच्या पहिल्या टप्प्यात १९ एप्रिलला मतदान होणार असून, नागपूर तसेच रामटेक लोकसभा मतदार संघाचा त्यात समावेश आहे.
नागपूर : लोकसभा निवडणूकीच्या मतदान प्रक्रियेदरम्यान प्रशासकीय यंत्रणेला दोन दिवसांची सेवा देण्यासाठी लालपरी सज्ज आहे. जिल्ह्यातील ८ तालुक्यातून आलेल्या मागणीनुसार, एसटीच्या अधिकाऱ्यांनी २४५ बसेसचे नियोजन केले आहे.
लोकसभा निवडणूकीच्या पहिल्या टप्प्यात १९ एप्रिलला मतदान होणार असून, नागपूर तसेच रामटेक लोकसभा मतदार संघाचा त्यात समावेश आहे. या मतदान प्रक्रियेत गुंतलेले मणूष्यबळ आणि साहित्याची ने-आण करण्यासाठी जिल्हा निवडणूक प्रशासनाकडून हिंगणा तालुक्यासाठी ५८, उमरेड तालुका ३८, रामटेक २४, काटोल ३६, सावनेर आणि कळमेश्वर तालुक्यासाठी १७ तसेच माैदा आणि कामठी तालुक्यासाठी ७२ अशा एकूण २४५ बसेसची मागणी महामंडळाकडे केली आहे. १८ आणि १९ असे दोन दिवस या बसेस प्रशासनाच्या सेवेत राहणार आहेत.
प्रवासी सेवेवर परिणाम ?
नागपूर जिल्ह्यात गणेशपेठ, उमरेड, काटोल, घाट रोड, रामटेक, सावनेर, इमामवाडा आणि वर्धमाननगर या आठ आगारात ४०३ बसेस आहेत. त्यातील २४५ बसेस दोन दिवस निवडणूक प्रक्रियेत गुंतणार आहे. अर्थात् १५८ बसेस प्रवाशांच्या सेवेसाठी शिल्लक राहणार आहे. या अपूऱ्या बसेसमुळे प्रवासी सेवेवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. ते लक्षात घेऊन एसटीच्या अधिकाऱ्यांनी उर्वरित बसेसच्या आधारे प्रवासी सेवा सुरळीत कशी ठेवता येईल, या संबंधाने नियोजन केले आहे.