‘भूमी अभिलेख’चे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 04:09 AM2021-01-23T04:09:29+5:302021-01-23T04:09:29+5:30
ड्रोन सर्वेक्षणाच्या नावे कामाची गती मंद सौरभ ढोरे लोकमत न्यूज नेटवर्क काटोल : काटोल शहरातील भूमी अभिलेख कार्यालयातील अपुरी ...
ड्रोन सर्वेक्षणाच्या नावे कामाची गती मंद
सौरभ ढोरे
लोकमत न्यूज नेटवर्क
काटोल : काटोल शहरातील भूमी अभिलेख कार्यालयातील अपुरी कर्मचारी संख्या, गावांचा वाढता व्याप त्यातच ड्रोन सर्वेक्षण यामुळे भूमी अभिलेख कार्यालयाच्या कामकाजाची गती अतिशय मंदावली आहे. यामुळे हे कार्यालय नागरिकांना सेवा पुरविण्यासाठी आहे की, त्यांच्या अडचणी वाढविण्यासाठी आहे, असा प्रश्न आता सामान्य नागरिकांना पडू लागला आहे. एकाच कामासाठी नागरिकांना वारंवार चकरा माराव्या लागत असल्याने हा त्रास आणखी किती दिवस सहन करायचा, असा प्रश्न आता विचारला जात आहे.
शहरातील धंतोली चौकात भूमी अभिलेखचे कार्यालय आहे. या कार्यालयातील अपुऱ्या मनुष्यबळामुळे नागरिकांची प्रशासकीय कामे रेंगाळली आहेत. या कार्यालयासाठी २३ कर्मचारी मंजूर असताना प्रत्यक्षात १६ कर्मचारी कार्यरत आहेत. त्यातील ८ कर्मचारी ड्रोन सर्वेक्षणाकरिता तर उर्वरितपैकी काही कर्मचारी वैद्यकीय रजेवर असल्याने केवळ एका अधिकाऱ्यासह पाच कर्मचारी तालुक्यातील १८८ गावांचा कारभार सांभाळत आहेत. त्यामुळे अधिकाऱ्यासह कार्यरत कर्मचाऱ्यांवरील कामाचा ताण वाढला आहे. शेकडो प्रकरणे प्रलंबित राहात आहेत. रोज नागरिक येतात, पण अधिकारी व कर्मचारी यांच्यावर नाराजीचा शेरा ओढून जातात. या कार्यालयाकडे अनेकांनी तातडीच्या मोजणीला प्रकरणे टाकली असूनही कामे होताना मात्र दिसत नाहीत.
ही कामे होतात येथे
भूमी अभिलेख कार्यालयातूनच शेतजमिनीची मोजणी, जमिनीचे नकाशे, भूसंपादन मोजणी, न्यायालयातून आलेल्या प्रकरणांचे निर्गतीकरण करणे, न्यायालयाच्या आदेशानुसार जमिनीची मोजणी, खरेदी-विक्री, वारस वाटणी नोंदी व त्याबाबतचे दाखले नमुने देण्याचे काम केले जाते.
मोजणीच्या नावावर कार्यालयाबाहेर
मोजणीच्या नावे कित्येक दिवस कर्मचारी कार्यालयात फिरकतच नाहीत. कार्यालयात अधिकारी व कर्मचारी केव्हा येणार, हे कोणालाच माहीत नसते. अनेक कर्मचारी मोजणीच्या नावाखाली कार्यालयात फिरकत नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
अतितातडीच्या मोजणीला सहा महिने
साधी मोजणी, तातडीची मोजणी, अतितातडीची असे मोजणीचे प्रकार आहे. अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे या कार्यालयातील प्रलंबित कामांत दिवसेंदिवस भरच पडत आहे. त्यामुळे अतितातडीच्या मोजणीला सहा महिने, तातडीची मोजणी सहा ते बारा महिने तर साध्या मोजणीला जादा कालावधी लागत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.
---
मागील काळात अतिरिक्त कर्मचारी घेऊन कामे कमी करण्यात आली. याची वरिष्ठांना माहितीही दिली. काटोल तालुका मोठा असून, कामाचा व्याप जास्त आहे. नागरिकांचे अर्ज लवकरच निकाली काढून विस्कटलेला कारभार नियमित करण्याचा प्रयत्न सुरु आहे.
- विजय पी. काठोटे
उपअधीक्षक, भूमी अभिलेख कार्यालय, काटोल