नागपुरात टिप्परमध्ये सापडली मोठ्या प्रमाणावर अवैध दारू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2018 11:19 PM2018-12-26T23:19:47+5:302018-12-26T23:23:40+5:30

धंतोली पोलिसांनी धंतोली उद्यानाजवळ असलेल्या एका टिप्परमध्ये असलेली मोठ्या प्रमाणावर अवैध दारू पकडली. मंगळवारी रात्री ही कारवाई करण्यात आली. ही दारू डुप्लिकेट असल्याचा पोलिसांचा संशय आहे.

Large amounts of illegal liquor found in Tipper at Nagpur | नागपुरात टिप्परमध्ये सापडली मोठ्या प्रमाणावर अवैध दारू

नागपुरात टिप्परमध्ये सापडली मोठ्या प्रमाणावर अवैध दारू

Next
ठळक मुद्देडुप्लिकेट दारू असल्याचा संशयअबकारी विभागाच्या मदतीने धंतोलीच्या गोदामावर धाड

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : धंतोली पोलिसांनी धंतोली उद्यानाजवळ असलेल्या एका टिप्परमध्ये असलेली मोठ्या प्रमाणावर अवैध दारू पकडली. मंगळवारी रात्री ही कारवाई करण्यात आली. ही दारू डुप्लिकेट असल्याचा पोलिसांचा संशय आहे.
दारूतस्करी होत असल्याच्या गुप्त माहितीच्या आधारावर धंतोलीचे ठाणेदार दिनेश शेंडे यांनी पथकासह धाड टाकली. पोलिसांना धंतोली येथील बाल भारती इमारतीजवळ एक टिप्पर ( एम.एच./३१/सी/क्यू/२६२१९ ) उभा असल्याचे दिसून आला. त्यांनी टिप्परची तपासणी केली असता टिप्परमध्ये देशी दारूच्या २०० पेट्या सापडल्या. टिप्पर चालक अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला.
टिप्परमध्ये जवळच्याच गोदामातून दारूच्या पेट्या ठेवण्यात आल्याचीही माहिती समोर आली आहे. पोलिसांना ही दारू नकली असल्याचा संशय आहे. रात्रीची वेळ असल्याने पोलिसांनी गोदामावर धाड टाकण्याऐवजी त्यावर पाळत ठेवण्याचा निर्णय घेतला. याच दरम्यान धंतोली पोलिसांनी अबकारी विभागाला सूचना दिली. अबकारी विभागाच्या मदतीने बुधवारी दुपारी घटनास्थळाजवळच असलेल्या सम्राट एजन्सीच्या गोदामावर धाड टाकण्यात आली. पोलीस व अबकारी विभागाने गोदामाची झडती घेतली. दारूच्या दोन पेट्या, खाली बॉटल आणि झाकणे सापडली. गोदामात सापडलेली दारू हरियाणाची असल्याचे सांगितले जाते. अबकारी विभागाने दारू आणि अन्य सामान जप्त केले. गोदामाजवळच एम.एच./४०/ए/ ८५१५ क्रमांकाचे वाहन सापडले. अबकारी विभागाच्या अधिकाऱ्यांनी वाहन जप्त केले आहे. तसेच गोदामात उपस्थित असलेल्या विनय जयस्वाल याला विचारपूस करण्यासाठी सोबत नेले आहे. अबकारी विभागातील सूत्रानुसार गोदामात दारूच्या खाली बॉटल, झाकणे सापडणे संशयास्पद आहे.
या प्रकरणातील आरोपी हे नकली दारूचा व्यवसाय करीत असल्याचा पोलिसांना संशय आहे. नकली दारू ही हरियाणा किंवा मध्य प्रदेशातून आणली जाते. तिथे महाराष्ट्राच्या तुलनेत दारू स्वस्त आहे. ती ब्रँडेड दारूच्या बॉटलमध्ये भरून विकली जाते. ही दारू चंद्रपूर, गडचिरोली आणि वर्धेला पाठवण्यात येते. हा व्यवसाय अनेक दिवसांपासून सुरु असल्याचा संशय आहे. नागपूर दारू तस्करीचे मोठे केंद्र आहे. यात अनेक गुन्हेगार आणि पांढरपेशे सामील आहेत.
ही कारवाई डीसीपी चिन्मय पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार दिनेश शेंडे, पीएसआय ए.के. वडतकर, पीएसआय तिवारी, कर्मचारी राजेश, पंढरी, गोपाल, मनोज आणि हेमराज यांनी केली.
नवीन वर्षासाठी अवैध दारू तस्कर सज्ज
शहरातील अवैध दारूचे तस्कर नवीन वर्षासाठी सज्ज आहेत. येथून दररोज लाखो रुपयांची दारू बाहेर पाठवली जात आहे. त्यांना पोलीस आणि अबकारी विभागाचा आश्रय असल्याने कारवाईसुद्धा थंडावली आहे. काही दिवसांपूर्वी नागभिड (जि. चंद्रपूर) येथे दारू माफियाने पीएसआय छत्रपती चिडे यांची हत्या केली होती. तेव्हापासून पोलिसांनी अवैध दारू तस्कराविरुद्ध कंबर कसली आहे.
दारू सप्लायरचा शोध
धंतोलीतील प्र्रकरणात धंतोली पोलीस दारूचा पुरवठा करणाऱ्या व्यापाऱ्यांचा शोध घेत आहे. विजेच्या बिलावरून गोदामाचे मालकाची ओळख अमरीश जायस्वाल या नावाने करण्यात आली आहे. पोलीस त्याला शोधत आहे. टिप्परमध्ये ठेवलेली दारू ही या गोदामामधील असल्याचा पोलिसांना संशय आहे. पोलिसांनी अबकारी विभागाकडून बॅच नंबरच्या आधारावर दारू पुरवठा करणाऱ्यांची माहिती मागवली आहे. या आधारावर कारवाई केली जाईल.

Web Title: Large amounts of illegal liquor found in Tipper at Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.