लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जुलै महिन्याचा शेवटचा आठवडा सुरू असूनही नागपुरात प्रचंड उकाडा पडला होता. सर्वच पावसाची आतुरतेने वाट पाहत होते. ही प्रतीक्षा गुरुवारी सायंकाळी फळाला आली. दोन ते अडीच तास झालेला मुसळधार पाऊस आणि नंतर बराच वेळ सुरू असलेल्या पावसाच्या सरीमुळे उकाडा कमी झाल्याने नागरिकांनाही दिलासा मिळाला.गुरुवारी दुपारी पाण्याच्या हलक्या सरी आल्या. परंतु चांगला पाऊस न झाल्याने पुन्हा उकाडा वाढला. त्यामुळे नागरिक चांगलेच त्रासले होते. परंतु सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास अचानक मुसळधार पाऊस सुरू झाला. अचानक आलेल्या पावसाने लोकांची ताराबंळ उडाली, परंतु त्यांच्या चेहऱ्यावर आनंद होता. दोन ते अडीच तास हा मुसळधार पाऊस होता. परंतु त्यानंतरही रात्री उशिरापर्यंत पावसाच्या सरी सुरूच असल्याने वातावरणात थंडावा निर्माण झाला. त्यामुळे नागरिक सुखावले. दरम्यान, श्रीमोहिनी कॉम्प्लेक्स ते संविधान चौकादरम्यान रस्त्यावरील एक झाड कोसळून पडले. येत्या २८ जुलै रोजी नागपुरात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
नागपुरात अखेर बरसल्या सरी, उकाडा झाला कमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2019 12:20 AM