एलबीटी मूल्यांकन अपिलावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 04:10 AM2021-02-26T04:10:08+5:302021-02-26T04:10:08+5:30
- नागपूर सीए संस्थेचे महापौरांना निवेदन : थकबाकीपूर्व ठेव घेऊ नये नागपूर : कोरोना महामारीच्या काळात व्यापार आणि उद्योग ...
- नागपूर सीए संस्थेचे महापौरांना निवेदन : थकबाकीपूर्व ठेव घेऊ नये
नागपूर : कोरोना महामारीच्या काळात व्यापार आणि उद्योग कठीण परिस्थितीतून जात असून एलबीटी मूल्यांकनाने त्रास वाढला आहे. यासंदर्भात गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी करणारे निवेदन आयसीएआयच्या नागपूर शाखेतर्फे महापौर दयाशंकर तिवारी यांना सिव्हील लाईन्स येथील कार्यालयात देण्यात आले.
प्रारंभी तिवारी यांचा सत्कार करून शाखेतर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती नागपूर सीए शाखेचे अध्यक्ष सीए साकेत बागडिया यांनी दिली. ते म्हणाले, कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येवर मनपाने केलेल्या विशेष उपाययोजना उत्तम आहेत. सध्या एलबीटी विभागाने दिलेल्या आदेशाविरुद्ध एखादे अपील दाखल करण्यासाठी ३० टक्के थकबाकीपूर्व ठेव म्हणून भरणे आवश्यक आहे. ऑगस्ट २०२० पर्यंत केवळ ५ हजार रुपये पेनॉल्टी लेव्ही जमा करून अपील करता येत होते. या महामारीच्या काळात व्यवसायाचे बरेच नुकसान झाले आहे. ऑगस्ट २०२० पासून व्यवसायाचे कार्यशील भांडवल आधीच जोडल्या गेले आहे. त्यामुळे या अटीचा डीलर्सला त्रास होत आहे. त्यामुळे पूर्वीच्या अटी कायम ठेवून एलबीटी मूल्यांकन प्रभावीपणे सोडविता येतील आणि त्याचा व्यावसायिकांना कसा फायदा होईल, यावर लक्ष देण्याची मागणी नागपूर सीए संस्थेने निवेदनात केली.
सामाजिक आणि व्यावसायिक कार्यातील योगदानाबद्दल महापौर दयाशंकर तिवारी यांनी नागपूर सीए संस्थेचे अभिनंदन केले. एलबीटीसंदर्भात नागपूर शाखेने दिलेल्या निवेदनावर लवकरच सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्वासन महापौरांनी दिले. याप्रसंगी नागपूर सीए संस्थेचे सचिव सीए संजय एम. अग्रवाल, माजी अध्यक्ष सीए सुरेन दुरगकर, डब्ल्यूआयआरसीचे माजी उपाध्यक्ष सीए जुल्फेश शाह उपस्थित होते.