Devendra Fadnavis: दाऊदच्या टोळीशी संबंधित असलेल्या नवाब मलिकांसाठी सरकारची धडपड पाहतोय- देवेंद्र फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2022 04:36 PM2022-05-21T16:36:29+5:302022-05-21T17:43:48+5:30

विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज माध्यमांशी संवाद साधत महाविकास आघाडीवर टीका केली आहे.

Leader of Opposition and former Chief Minister Devendra Fadnavis while interacting with media today criticized Mahavikas Aghadi. | Devendra Fadnavis: दाऊदच्या टोळीशी संबंधित असलेल्या नवाब मलिकांसाठी सरकारची धडपड पाहतोय- देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis: दाऊदच्या टोळीशी संबंधित असलेल्या नवाब मलिकांसाठी सरकारची धडपड पाहतोय- देवेंद्र फडणवीस

Next

नागपूर- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) आताच्या घडीला आर्थिक गैरव्यवहारांच्या आरोपाखाली तुरुंगात आहेत. यातच आता नवाब मलिक यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. मुंबईतल्या गोवावाला कम्पाऊंडला हडप करण्यासाठी नवाब मलिक यांचे दाऊदच्या टोळीशी थेट संबंध असल्याचे सकृतदर्शनी पुरावे आहेत, असे महत्त्वपूर्ण निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे. 

मुंबई विशेष न्यायालयात यासंदर्भातील याचिकेवरील सुनावणीवेळी न्यायालयाने काही गोष्टी स्पष्ट असल्याचे म्हटले आहे. नवाब मलिक हे जाणूनबुजून आणि थेट मनी लाँड्रिंगच्या गुन्ह्यात सहभागी असल्याचेही यावेळी न्यायालयाने नमूद केले आहे. ईडीने मलिक यांच्या विरोधात दाखल केलेल्या आरोपपत्राची दखल न्यायालयाने घेतली. न्यायालयाच्या या स्पष्टीकरणानंतर भाजपाने निशाणा साधला आहे. 

विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज माध्यमांशी संवाद साधत महाविकास आघाडीवर टीकास्त्र सोडलं आहे.
महाविकास आघाडी सरकारने जेवढी काळजी नवाब मलिक यांची घेतली, त्यापेक्षा थोडी कमी काळजी ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी घेतली, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. 

दोन वर्षे हे सरकार इम्पेरिकल डेटा तयार करण्याकरता, ओबीसी आरक्षणाकरता कुठलीही धडपड करत नाही. मात्र त्याचवेळी डी गॅंगशी संबंधित जेलमध्ये असलेले नवाब मलिक मंत्रीमंडळात राहायला हवेत, यासाठी सरकारची धडपड आपण पाहतोय. याच्यापेक्षा अर्धी धडपड इम्पेरिकल डेटा गोळा करण्यासाठी केली असती तर ओबीसी आरक्षण गेले नसते, असंही देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.

दरम्यान, २१ एप्रिल रोजी ईडीने मलिक यांच्याविरोधात दोषारोपपत्र दाखल केले होते. कुर्ल्यातील गोवावाला कंपाऊंड ताब्यात घेण्यासाठी नवाब मलिक आणि अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची बहीण हसीना पारकर आणि त्यांचा अंगरक्षक सलीम पटेल यांच्यात अनेक बैठका झाल्याचेही पुढे आले आहे. दोषारोपपत्राची दखल घेत विशेष न्यायालयाने नवाब मलिक आणि १९९३ च्या बॉम्बस्फोटातील दोषी आणि सरदार शाहवली खान यांच्याविरुद्धची कारवाई पुढे चालू ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. 

ईडीने चार्टशीटमध्ये १७ जणांना साक्षीदार बनवले-

ईडीने आपल्या चार्टशीटमध्ये १७ जणांना साक्षीदार बनवले आहे. त्यात दाऊदचा भाऊ इक्बाल कासकर आणि हसीना पारकरचा मुलगा अलीशाह पारकर यांच्यासह सरदार शाहवली खान यांच्या जबाबांचाही समावेश आहे. हसीना पारकर दाऊद इब्राहिमच्या जवळची होती आणि सलीम पटेल पारकरचा अंगरक्षक होता, असे शाहवली खानने आपल्या वक्तव्यात सांगितले. मालमत्तेबाबतचा प्रत्येक निर्णय हा हसीना पारकर यांच्या सूचनेनुसार पटेल यांनी घेतला, असेही सांगितले.

Web Title: Leader of Opposition and former Chief Minister Devendra Fadnavis while interacting with media today criticized Mahavikas Aghadi.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.