कन्हान नदीत पुन्हा राख; नागपूरकरांनो तुमच्या घरी येतेय, खापरखेडा केंद्रातील राखेचे पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2022 12:51 PM2022-07-25T12:51:00+5:302022-07-25T14:51:22+5:30
राखेचे प्रमाण अधिक वाढल्यास जलशुद्धीकरण केंद्राचे काम थांबवावे लागेल आणि त्याचा परिणाम उत्तर आणि दक्षिण नागपूरच्या पाणीपुरवठ्यावर हाेणार असल्याचे ओसीडब्ल्यूने स्पष्ट केले आहे.
नागपूर : वीज केंद्राच्या अधिकाऱ्यांनी जणू नागपूरकरांना राखमिश्रित पाणी पाजून आराेग्य धाेक्यात घालण्याचा चंगच बांधलेला दिसताे आहे. खापरखेडा औष्णिक वीज केंद्राच्या वारेगाव ॲशपाॅण्डमधून लिकेज हाेत असलेली राख काेलार नदीवाटे पुन्हा कन्हान नदीत आली आहे. रविवारी कन्हानच्या ट्रीटमेंट प्लॅन्टजवळ ही राख दिसून आली. त्यामुळे नागपूरच्या काही भागातील पाणीपुरवठा बाधित हाेण्याची शक्यता ओसीडब्ल्यूच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
खापरखेडा वीज केंद्रातून निघणारी राख वारेगाव ॲशपाॅण्डमध्ये जमा केली जाते. गेल्या दाेन दिवसांपासून पाऊस वाढल्याने वारेगाच्या ओव्हरफ्लाे पाॅइंटवरून हे राखमिश्रित पाणी काेलार नदीत वाहत जात आहे. ही नदी पुढे कन्हान नदीला भेट असल्याने राखेचे पाणी कन्हानमध्ये मिसळत आहे. रविवारी कन्हान नदीवरील जलशुद्धीकरण केंद्राच्या विहिरीजवळ ही राख दिसून आली. राखेचे प्रमाण अधिक वाढल्यास जलशुद्धीकरण केंद्राचे काम थांबवावे लागेल आणि त्याचा परिणाम उत्तर आणि दक्षिण नागपूरच्या पाणीपुरवठ्यावर हाेणार असल्याचे ओसीडब्ल्यूने स्पष्ट केले आहे.
दरम्यान सेंटर फाॅर सस्टेनेबल डेव्हलपमेंट या एनजीओने अधिक सर्वेक्षण केले असता वारेगाव ॲशपाॅण्डच्या बंधाऱ्यात तीन ठिकाणी लिकेज असल्याचे दिसून आले. केटीपीएसच्या ॲशपाॅण्डची पाइपलाइन व एअर व्हाॅल्व्हमधून लिकेज हाेत असल्याचे सांगण्यात येत आहे. हा गंभीर प्रकार हाेत असताना खापरखेडा प्रकल्प प्रशासनाचा बेजबाबदारपणा कायम आहे. सीएफएसडीच्या कार्यकर्त्यांनी तीन ठिकाणचे लिकेज नमूद केले आहेत.
- सुरादेवीजवळ फ्लायॲश पाइपलाइन लिकेज हाेत राखमिश्रित पाणी काेलार नदीत मिसळत आहे.
- वारेगावच्या नवीन पंप हाऊसजवळही लिकेज दिसून आले. राख बंधाऱ्यातून ओव्हरफ्लो पाणी सेडिमेंट टँकमध्ये गाेळा करून केटीपीएसमध्ये पुन्हा वापरण्यासाठी रिसायकल व पंप करणे आवश्यक आहे. दुर्दैवाने हे केवळ अर्धवट आणि मोठ्या प्रमाणात ओव्हरफ्लो हाेत असलेली राख मुक्तपणे कोलार प्रवाहात वाहते.
- एनडीआरएफची बांधकाम साइट : वारेगाव ते खैरीदरम्यानचा रस्ता, राखेची पाइपलाइन कोलार नदीच्या पुलावरून जाते. पुलावर आणि रस्त्यावर अनेक ठिकाणी पाइपलाइन लीक होत असून बाहेर पडलेली राख कोलार नदीत वाहत आहे.
राखेचे आरोग्यावर गंभीर परिणाम
वीज केंद्राच्या राखेमध्ये मर्क्युरी, कॅडमियम, अर्सेनिक, शिसे यांसारखी घातक रसायने असतात. कोळशाची राख धोकादायक आहे. पाण्यात मिसळल्यास अल्पकालीन संपर्कामुळे नाक, घसा, डोळ्यात जळजळ, चक्कर येणे, मळमळ, उलट्या आणि श्वास लागणे असा त्रास होऊ शकतो. दीर्घकाळापर्यंत संपर्कामुळे यकृताचे नुकसान, मूत्रपिंडाचे नुकसान, ह्रदयाचे आजार आणि विविध प्रकारचे कर्करोग होऊ शकतात.