जन्म-मृत्यूच्या फेऱ्याची जाणीव निसर्ग मानवाला प्रत्यक्ष कृतीतून करवून देतो. उमललेली गोंडस पाने हळूहळू मोठी होत जातात आणि अखेर शुष्क होऊन पाचोळ्यात रूपांतरित होतात. हा पाचोळा म्हणजेच अस्तित्वाचे उरलेले अवशेष आणि त्याचेही पुन्हा मातीतच रूपांतरण होत जाते. कथ्था (शिशू), पोपटी (बाल), हिरवा (किशोर), गर्द हिरवा (तारुण्य), पिवळा (प्रगल्भ) आणि मातका (वृद्ध) असे पानांचे बदलणारे रंग, मानवी जीवनचक्राचे प्रतिबिंबच म्हणावे. जिथे कुठे वनराजी अस्तित्वात आहे, तिथे निसर्गाचे हे चक्र ऋतुसंधीचा (वसंत आणि शिशिर ऋतूचा मेळ) अनुभव देत आहे. ती-तो गेला आणि पुन्हा कधीही परतणार नाही, हे माहीत असतानाही आठवणींचा फास सोडवावासा वाटत नाही. अश्रूंचा बांध फोडणारा हा भाव प्रत्यक्ष निसर्ग ठेवतो असा हा पानगळतीचा मोसम विरहवेदनेला समर्पित आहे. विचित्र मानसिकतेची जाणीव हा काळ करवून देत आहे.
‘’?!