नागपूरमध्ये जलाशयात बिबट्या आढळला मृतावस्थेत
By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2020 10:51 PM2020-01-25T22:51:26+5:302020-01-25T22:54:56+5:30
मृत्यूचे कारण अस्पष्ट; उद्या शवविच्छेदन होणार
पिपरा बेला : उमरेड तालुक्यातील पिपरा बेला नजीकच्या शेडेश्वर-नांद जलाशयात शनिवारी बिबट्याचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली. बिबट्याच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले, तरी पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
उमरेड तालुक्यात पिपरा बेला नजीकच्या शेडेश्वर-नांद जलाशयात शनिवारी संध्याकाळी साडे पाचच्या सुमारास स्थानिक शेतकऱ्यांना बिबट्याचा मृतदेह तरंगताना आढळून आला. शेतकऱ्यांनी याबाबतची माहिती आमघाटचे सहायक वनपरिक्षेत्र अधिकारी ए. एच. खडसे यांना दिली. खडसे संध्याकाळी 6 वाजता वन विभागाच्या बचाव पथकासह घटनास्थळी दाखल झाले. वन विभागाचे पथक आणि स्थानिक शेतकऱ्यांनी बिबट्याचा मृतदेह जलाशयातून बाहेर काढला. बिबट्या अंदाजे चार वर्षाचा आहे. त्याच्या अंगावर कोणत्याही जखमा नसून मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदनानंतर सांगता येईल अशी माहिती खडसे यांनी दिली. याबाबत उमरेडचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. मुकुंद कडू यांना सूचना देण्यात आली असून रविवारी सकाळी शवविच्छेदन करण्यात येणार आहे.