गुन्हेगारीचा कलंक लागलेल्या ‘रहाटेनगर टोली’त ज्ञानार्जनाचे धडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2023 08:10 AM2023-01-01T08:10:00+5:302023-01-01T08:10:01+5:30

Nagpur News मांग गारूडी समाजातील मुलांना शिक्षणाची गोडी लागावी म्हणून नागपुरात एक तरूण गेल्या १७ वर्षांपासून प्रयत्न करतो आहे.

Lessons of knowledge acquisition in 'Rahatenagar Toli' which has the stigma of crime | गुन्हेगारीचा कलंक लागलेल्या ‘रहाटेनगर टोली’त ज्ञानार्जनाचे धडे

गुन्हेगारीचा कलंक लागलेल्या ‘रहाटेनगर टोली’त ज्ञानार्जनाचे धडे

googlenewsNext
ठळक मुद्दे खुशाल ढाक या तरुणाच्या ध्यासामुळे मुलांच्या आयुष्याला परिवर्तनाची दिशापहिल्यांदाच अभ्यासिका सुरू


मंगेश व्यवहारे

नागपूर : अनेकदा आयुष्यातील निर्णय चुकतात अन् आयुष्य चुकत जातं, त्यातला प्रश्न आपल्याला कधीच कळत नाही. त्यामुळे उत्तर चुकत जातं. आपलं कुठे चुकतं, हे कळत नाही आणि दाखवणाऱ्याला वाट माहीत नसते. पण, आयुष्याला परिवर्तनाची दिशा देण्यासाठी कुणी मिळाला तर आयुष्य सुंदर बनतं. परिवर्तनाचा ध्यास बाळगून संस्काराचे बीज पेरणाऱ्या खुशाल ढाक या तरुणाचा ध्यास काहीसा असाच आहे. तो गुन्हेगारीचा कलंक लागलेल्या ‘रहाटेनगर टोली’ वस्तीत ज्ञानार्जनाचे धडे देतोय. त्याची अभ्यासिका इथल्या मुलांमध्ये परिवर्तन घडवत आहे. त्यात काही अंशी यश आल्याने तो समाधानीही आहे.

नागपुरातील रहाटेनगर टोली ही मांग गारुडी समाजाची वस्ती. अख्ख्या शहरात ही वस्ती प्रसिद्ध आहे. अवैध दारूविक्रीबरोबरच कबाड वेचणे, भीक मागणे, म्हशी भादरणे, कानातील मळ काढणे, पिढ्यान् पिढ्यांपासून यांचे हेच कामधंदे आहेत. गेल्या काही वर्षांपासून या वस्तीतील मुलांना शिक्षणाचा गंध लागावा, यासाठी खुशाल ढाक नावाचा तरुणाने ध्यास बाळगला आहे. वस्तीशाळेपासून सुरू झालेला त्याचा प्रवास आज अभ्यासिकेपर्यंत पोहोचला आहे. दोन वर्षांपूर्वी या वस्तीत त्याने सुरू केलेली अभ्यासिका येथील मुलांमध्ये शिक्षणाचे बीजारोपण करीत आहे.

कधीकाळी शहराच्या वेशीला असलेली ही वस्ती. वाढत्या शहरीकरणामुळे शहराच्या मधात आली. पण इथे अंगणवाडी, शाळा काही सुरू झाली नाही. कारण काय तर या वस्तीतील गल्लोगल्लीत दारूची विक्री होते. येथे गोंगाट, भांडणे हे रोजचेच आहे. अशा वातावरणात वावरताना वयात आलेल्या मुलामुलींचे आयुष्यसुद्धा गुरफटून जायचे. खुशाल ढाक नावाचा तरुण गेल्या १७ वर्षांपासून या वस्तीतील मुलांना परंपरेच्या जोखडातून मुक्त करण्याचा प्रयत्न करतोय. त्याला त्याचा प्रचंड त्रास झाला. मात्र तो आपल्या प्रयत्नात एक एक पाऊल पुढे टाकत आहे. ४५०० लोकवस्तीमध्ये त्याने ठिकठिकाणी वस्तीशाळा सुरू केल्या. येथील मुलांना परिसरातील सरकारी शाळेत दाखल केले. वस्तीशाळेच्या माध्यमातून सायंकाळी मुलांचा अभ्यास घेणे सुरू केले. येथील कचरा वेचणाऱ्या मुलींसाठी शिवणक्लासचे वर्ग उभारले. त्यातून मुलींना आत्मसन्मानाने जगण्याची उमेद दिली. शिक्षणाच्या माध्यमातून हळूहळू बदल घडवित, खुशालचे पाऊल अभ्यासिकेपर्यंत पोहचले. दोन वर्षांपूर्वी त्याने छोटी अभ्यासिका उभारली. समाजभान जपणाऱ्यांकडून त्यासाठी मदतदेखील झाली. कुणी महापुरुषांची पुस्तके दिली, कुणी अभ्यासिका उभारण्यासाठी साहित्य उपलब्ध केले. शालेय पुस्तकांचीही मदत झाली.

बारावीपर्यंतची पहिलीच पिढी

खुशालने सुरू केलेल्या अभ्यासिकेत परिसरातील २८ मुलांची नोंद आहे. दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना येथे नि:शुल्क वर्ग घेतले जातात. या वस्तीत बारावीपर्यंत पोहोचलेली पहिली पिढी आहे. या अभ्यासिकेचा उपयोग करून मुलामुलींनी उच्च शिक्षण घ्यावे, असा खुशालचा प्रयत्न आहे.

 

- माझा प्रयत्न आहे की, यांच्या येणाऱ्या पिढ्या या परंपरेच्या जोखडातून मुक्त होऊन समाजाच्या मुख्य प्रवाहात याव्यात. हे परिवर्तन केवळ शिक्षणातूनच होऊ शकते. त्यासाठी शिक्षणाच्या विविध माध्यमातून त्यासाठी प्रयत्न सुरू आहे. पण, काही तरी साध्य होत आहे, हे समाधान आहे.

-खुशाल ढाक, सामाजिक कार्यकर्ता

Web Title: Lessons of knowledge acquisition in 'Rahatenagar Toli' which has the stigma of crime

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.