लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आपले सुप्त गुण, आपली आवड, आपले कार्य ज्या क्षेत्रात आहे ते समाजापर्यंत पोहोचू द्या आणि आत्मविश्वासाने काम करा, असे आवाहन ज्येष्ठ साहित्यिक अरुणा सबाने यांनी महिलांना केले.
नागपूर महानगरपालिकेचा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त ज्योती त्र्यंबकराव कोहळे यांच्या ‘स्त्री ची यशोगाथा’ व ‘हसत खेळत शिकू’ या दोन पुस्तकांचे प्रकाशन करताना त्या बोलत होत्या.
रामदासपेठ येथील मोर हिंदी शाळेच्या सभागृहात पार पडलेल्या या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्त्या वृंदा ठाकरे होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेविका रूपा राय, शंकरराव सांबारे, अभ्यंकर, नगरसेविका रेखा बाराहाते उपस्थित होते.
‘स्त्री ची यशोगाथा’ मध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातील ११ महिलांचा संघर्ष सादर करण्यात आला आहे तर ‘हसत खेळत शिकू’ या पुस्तकात शाळेत वर्षभर राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती देण्यात आली आहे. कार्यक्रमाचे संचालन डॉ. वसुधा वैद्य यांनी केले तर आभार नीता गोपालन यांनी मानले.