ठाकरे महाराज पंढरपूरला यावेत, ही जणू विठ्ठलाचीच इच्छा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:07 AM2021-07-20T04:07:13+5:302021-07-20T04:07:13+5:30
प्रवीण खापरे : लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : भक्ताच्या भावनेपुढे देवही हतबल असतो आणि त्याला जो हवा त्याला तो ...
प्रवीण खापरे : लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भक्ताच्या भावनेपुढे देवही हतबल असतो आणि त्याला जो हवा त्याला तो बोलावतोच. किंबहुना, त्याला साक्षात्कार देण्यासाठी अडथळे पार करण्याची प्रेरणा व सामर्थ्यही देतो. देव भक्ताचा भुकेला असतो, हे उदाहरण द्यायचे झाले तर नागपूरचे फेटरी येथील ह.भ.प. प्रमोद महाराज ठाकरे यांचे द्यावे लागेल. वर्तमानातील परिस्थितीनुरूप आलेले अनेक अडथळे पार करीत ठाकरे महाराज पंढरपुरात दाखल झाले आहेत. जणू ठाकरे महाराज पंढरपुरी यावेत ही विठ्ठलाचीची इच्छा होय.
परंपरेप्रमाणे दरवर्षी देवशयनी एकादशीच्या पंधरा दिवस आधी वेगवेगळ्या ठिकाणच्या पालखी आळंदी येथे पोहोचतात आणि दुसऱ्या दिवशी तेथून पंढरपुराकडे पायी वारी सुरू होते. यंदा २ जुलै रोजी वारकऱ्यांची पालखी आळंदीला पोहोचली आणि ३ जुलै रोजी तेथून आळंदीकडे पायी वारी रवाना झाली. त्यात विश्व वारकरी सेवा संस्थान, नागपूरच्या वतीने ह.भ.प. प्रमोद महाराज ठाकरे यांच्या नेतृत्वात विदर्भातील पालखी, दिंडींचा सहभाग होता. मानाच्या प्रत्येक पालखी-दिंडीत केवळ ४० वारकरी असे एकूण ४०० वारकरी देवशयनी एकादशीला पंढरपुरात प्रवेश करीत आहेत आणि त्यात भरतवाडा, काटोल येथील सद्गुरू जोध महाराज दिंडीचे ते एकट्यानेच नेतृत्व करीत आहेत.
हा प्रवासच माझ्या विठ्ठलाचा साक्षात्कार
पंढरपुरीची वारी म्हणजे केवळ विठ्ठलाच्या चरणाचे दर्शन नव्हे, तर येथे जमणाऱ्या वारकऱ्यांच्या तना-मनात वास करणाऱ्या पांडुरंगाच्या दर्शनाचा सोहळा असतो. वृद्धही तरुण होतो, आंधळाही डोळस होतो... याची साक्षात प्रचीती या वारीत असते. यंदा तो सोहळा नाही; पण देहभान विसरण्याचा भाव कुणाचाच कमी झालेला नाही. निर्बंधांचे अनेक अडथळे पार करीत पंढरपुरात पोहोचणारा प्रत्येक वारकरी हा विठ्ठलाचा साक्षात्कारच आहे.
- ह.भ.प. प्रमोद महाराज ठाकरे
आमच्या निमंत्रणाला मान मिळाला
पंढरपुरातील संत शिरोमणी नामदेव महाराज पालखी सोहळ्याचा मानकरी म्हणून इतर जिल्ह्यातून येणाऱ्या वारकऱ्यांच्या पालखी-दिंडीला निमंत्रण देण्याची आमची परंपरा आहे. नामदेव महाराजांचे वंशज ही परंपरा आजही पाळत आहेत. इतके अडथळे पार करीत ठाकरे महाराज आणि इतर पंढरपूरला आले, ही आमचा मान वाढविणारी घटना आहे.
- ह.भ.प. राम महाराज झिंजुर्के, मानकरी
.................