अशांतता पसरविणाऱ्यांचा नीट बंदोबस्त करू; गृहमंत्र्यांचा नागपुरात इशारा 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2022 05:57 AM2022-04-20T05:57:51+5:302022-04-20T05:59:30+5:30

वळसे-पाटील म्हणाले,  अमरावती, अकोटमध्ये काय घडले याची पोलीस चौकशी करीत आहेत. या भागांत दंगली घडत आहेत. एका विशिष्ट परिसरामध्ये या सर्व घटना घडतात.

Let's deal with those who spread unrest; Home Minister Dilip Walse Patil warning in Nagpur | अशांतता पसरविणाऱ्यांचा नीट बंदोबस्त करू; गृहमंत्र्यांचा नागपुरात इशारा 

अशांतता पसरविणाऱ्यांचा नीट बंदोबस्त करू; गृहमंत्र्यांचा नागपुरात इशारा 

googlenewsNext

नागपूर:  देशात वेगवेगळ्या कारणांवरून जातीय भावना भडकविण्याचा प्रयत्न होतोय. महाराष्ट्रात सातत्याने अशांतता पसरविण्याचे काम केले जात आहे. काही लोक त्यात सामील आहेत. अशा लोकांचा योग्य बंदोबस्त केला जाईल, असा सज्जड इशारा गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी मंगळवारी नागपुरातून दिला. 

पत्रकारांशी बोलताना -
वळसे-पाटील म्हणाले,  अमरावती, अकोटमध्ये काय घडले याची पोलीस चौकशी करीत आहेत. या भागांत दंगली घडत आहेत. एका विशिष्ट परिसरामध्ये या सर्व घटना घडतात.  म्हणजे तिथे काही घटक ॲक्टिव्ह आहेत. त्यांचा बंदोबस्त करणे आवश्यक आहे. पोलीस महासंचालकांना सूचना देण्यात आल्या आहेत. पोलीस महासंचालक व पोलीस आयुक्त स्तरावर बैठक होईल. मग परत एकदा मुख्यमंत्र्यांसोबत या विषयावर चर्चा करू आणि अंतिम निर्णय घेऊ, असेही वळसे-पाटील म्हणाले.

३ मेसाठी पोलीस यंत्रणा सज्ज  -
कायदा व सुरक्षाव्यवस्थेचा प्रश्न बिघडणार नाही.  कुठल्याही वक्तव्यामुळे समाजात तेढ निर्माण होत असेल, अशांतता निर्माण होत असेल अशी कोणतीही कृती कारवाईस पात्र ठरते. संबंधित व्यक्तींवर कारवाई करण्यात येईल.
    - दिलीप वळसे-पाटील, गृहमंत्री 

केंद्राने सुरक्षा देणे हे राज्यावर अतिक्रमण -
केंद्र सरकारकडून काहींना सुरक्षा पुरविली जात आहे.  राज्य सरकारच्या सार्वभौम अधिकाराला बाजूला सारून काही व्यक्तींना सुरक्षा पुरविली जाते, हे राज्य सरकारच्या अधिकारावर अतिक्रमण आहे, अशी टीका त्यांनी केली. 

तेव्हा भाजपने का नाही हटविले भोंगे : तोगडिया -
भाजपशासित राज्यांतील भोंग्यांबाबत मौन बाळगून महाराष्ट्रात आंदोलनाची भाषा सुरू आहे. सत्तेत असताना भाजपने भोंगे का हटविले नाहीत, असा सवाल आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे अध्यक्ष डॉ. प्रवीण तोगडिया यांनी केला. ते म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिले की, रात्री १० नंतर सकाळी सूर्योदयापर्यंत भोंगा वाजवू शकत नाही. याचे पालन सर्व राज्य शासनांनी करणे अपेक्षित आहे.

राज ठाकरेंचे समर्थन भाजपसाठी धोक्याचे : आठवले -
मनसेची भूमिका ही अतिहार्ड असून, ही हार्ड भूमिका घेऊन भाजपला फायदा होणार नाही. राज ठाकरे यांचे समर्थन घेणे राजकीय पातळीवर भाजपला महागात पडेल, असे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले येथे मंगळवारी म्हणाले. भाजप आणि मनसेची युती होऊच शकत नाही. रिपाइं पक्ष भाजपसोबत असताना त्यांना मनसेची गरज नाही, असेही ते म्हणाले.

मुंबईत ७२% मशिदींकडून पहाटे भोंग्यांचा वापर बंद -
राज्यात भोंग्याचा प्रश्न तापला असताना, मुंबई पोलिसांनी केलेल्या सर्वेक्षणात मुंबईतील ७२ टक्के मशिदींकडून पहाटे भोंग्यांचा वापर बंद केला असल्याची माहिती समोर आल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. 
 

Web Title: Let's deal with those who spread unrest; Home Minister Dilip Walse Patil warning in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.