चला करू या मैत्री विज्ञानाशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2019 11:19 AM2019-11-28T11:19:00+5:302019-11-28T11:21:10+5:30
ना प्रयोगशाळा, ना प्रयोगशाळेतील भारीभारी उपकरणे तरी गेल्या २१ वर्षांपासून अपूर्व विज्ञान मेळा रंजक विज्ञानाची संकल्पना मांडत आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ना प्रयोगशाळा, ना प्रयोगशाळेतील भारीभारी उपकरणे तरी गेल्या २१ वर्षांपासून अपूर्व विज्ञान मेळा रंजक विज्ञानाची संकल्पना मांडत आला आहे. नागपूर महापालिका व असोसिएशन फॉर रिसर्च अॅण्ड ट्रेनिंग इन बेसिक सायन्स एज्युकेशनद्वारे या मेळाव्याचे आयोजन राष्ट्रभाषा भवनात करण्यात आले आहे.
रिफिल, प्लास्टिकच्या बॉटल्स, सेल, तांब्याची तार, कंचे, चेंडू, चुंबक, फुगा, दगड, माती यापासून विज्ञानाचे मूलभूत सिद्धांत अपूर्व विज्ञान मेळाव्यातून सहज सोप्या पद्धतीने मांडले आहेत. विज्ञानाच्या बाबतीत येणारे का? आणि कसे? अशा अनेक प्रश्नांच्या उत्तराची प्रचिती या मेळाव्यातून येते. ‘चला करू या विज्ञानाशी मैत्री’या संकल्पनेतून विज्ञानाची डोकेदुखी येथे सहज सोपी झालेली दिसते आहे. हे सर्व प्रयोग महापालिकेच्या विद्यार्थ्यांनी साकारले आहेत. मुलांच्या सुप्तगुणांचा विकास या मेळाव्याच्या माध्यमातून होतो. वेस्टपासून विद्यार्थ्यांनी हे प्रयोग साकारले असून, यातून न्यूटनचा सिद्धांत, बर्नालीने सांगितलेला हवेच्या दाबाचा सिद्धांत, गुरुत्वाकर्षणाच्या सिद्धांताची प्रचिती येते. या विज्ञान मेळाव्यात ३५ शाळेतील विद्यार्थ्यांचे १३० प्रयोग आहेत. हे सर्व प्रयोग विद्यार्थ्यांना आकर्षित करीत असल्याचे मार्गदर्शक दीप्ती बिस्ट यांनी सांगितले. या विज्ञान मेळाव्याचे उद्घाटन महापौर संदीप जोशी यांच्या
हस्ते झाले.
कसे उडतात तुषार
काचेच्या बाटलीमध्ये भरलेले पाणी आणि झाकणावर लावलेली रिफिल, विद्यार्थिनीने फुंकर मारली की भरभर तुषार उडतात. का? तर हवेचा दाब पाण्याला वर ढकलतो.
चंद्र-सूर्य दिसतात एकाच अंतरावर
पृथ्वीवरून सूर्य व चंद्र एकाच आकाराचे दिसतात, हे अतिशय रंजक पद्धतीने सूर्य-चंद्र आणि पृथ्वीतील अंतर दाखविले आहे.
एका खिळ्यावर किती खिळे
विद्यार्थ्याने मांडलेला हा प्रयोग डोक्याला झणझणी आणतो. कारण उभ्या असलेल्या एका खिळ्यावर तो विद्यार्थी कितीतरी खिळे मांडतो.
कुछ कुछ एलियन जैसा
वाकलेल्या तारेला बांधलेले दोन चेंडू बघितल्यावर काय असेल हे, असे कुतुहलाने वाटते. पण हा तार जेव्हा डोक्यावर ठेवतो, तेव्हा चेंडू आपल्या डोक्यावर लटकलेले असतात. हा प्रयोग स्वसंतुलनावर आहे. त्याला विद्यार्थ्याने कुछ कुछ एलियन जैसा असे नाव दिले आहे.
आपले हात कधीच स्थिर राहत नाही
एक स्केल आणि त्याला लागलेली एक पिन आपल्याला दाखविते की आपले हात कधीच स्थिर राहत नाही.