नागपूर : एकीकडे अजनी येथील हजाराे झाडांच्या कत्तलीविराेधात माेहीम सुरू असताना दुसरीकडे वनसंपदेसाेबत ताेडली जाणारी रेल्वे मेन्स शाळा वाचविण्यासाठीही अभियान चालले आहे. हे अभियान शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी रेटले आहे. याअंतर्गत रविवारी पाेस्टकार्ड आंदाेलन करण्यात आले. अजनीवन आणि शाळा साेडा, नाहीतर इंटर माॅडेल स्टेशन प्रकल्प हटवा, असे आव्हान देत पाेस्टकार्डद्वारे पंतप्रधान नरेंद्र माेदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी तसेच पर्यावरण मंत्रालयाला पत्र पाठविण्यात आले.
रविवारी एकीकडे वृक्षताेडीविराेधात चिपकाे आंदाेलन करण्यात आले तर त्याला जाेडून रेल्वे मेन्स शाळा ताेडण्याच्या विराेधात पाेस्टकार्ड आंदाेलन करण्यात आले. सामाजिक कार्यकर्ता अनिकेत कुत्तरमारे या माजी विद्यार्थ्याच्या हाकेवर अनेक माजी विद्यार्थी शाळेसाठी सरसावले. शाळेत १९६७ च्या बॅचपासून १९७५, १९८७ ते १९९३ च्या बॅचचे आणि नुकतेच पासआऊट झालेले, जाॅब करीत असलेले माजी विद्यार्थी अभियानात सहभागी झाले. अनिकेत व त्याच्या सहकाऱ्यांनी शेकडाे पाेस्टकार्ड आणले. शाळेच्या आवारात शेकडाेच्या संख्येने गाेळा झालेल्या माजी विद्यार्थ्यांनी स्वत: पत्र लिहिले व संबंधित मंत्र्याच्या नवी दिल्लीतील पत्त्यावर पाठविण्यासाठी गाेळा केले. अशाप्रकारे ५००० पत्र गाेळा करून ते विविध मंत्र्यांना पाठविले जाणार असल्याचे अनिकेतने लाेकमतशी बाेलताना सांगितले. हजाराे झाडांची कत्तल करू नका, शाळा ताेडू नका, अशी मागणी पत्राद्वारे करण्यात आली आहे. सर्व सहभागी आंदाेलकांनी स्वत:चे पत्र टॅग करून त्यांच्या साेशल मीडियाच्या अकाऊंटवर शेअर केले आणि देशभर, जगभर असलेल्या माजी विद्यार्थ्यांना या अभियानात सहभागी हाेण्याचे आवाहन करण्यात आले.