ऑनलाइन लोकमतनागपूर : ५० हजाराच्या खंडणीसाठी मित्राच्या १० महिन्याच्या मुलीचे अपहरण करणाºया एका आरोपीला अतिरिक्त सत्र न्यायाधीश विभा इंगळे यांच्या न्यायालयाने जन्मठेप आणि १८ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.अतुल अनंतराव काटे (४०) असे आरोपीचे नाव असून, तो गोवा राज्याच्या पणजी भागातील तलीगाव अराडीबंद येथील रहिवासी आहे. या प्रकरणात अतुलची पत्नी विशाखा (३४) ही सुद्धा आरोपी असून, ती खटला सुरू असतानाच फरार झाली होती. त्यामुळे तिला अटक होताच तिच्याविरुद्ध वेगळा खटला चालविण्यात येणार आहे. न्यायालयाने तिला फरार घोषित करून अटक करण्याचे निर्देश पोलिसांना दिले आहेत.सृष्टी मनोज वैरागडे असे अपहृत मुलीचे नाव असून, ती अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील उल्हासनगरच्या श्रीधेनू कॉम्प्लेक्स येथील रहिवासी आहे.खटल्याची पार्श्वभूमी अशी, सृष्टीचे वडील मनोज आणि आरोपी अतुल काटे हे वर्गमित्र असल्याने त्यांची ओळख होती. प्रारंभी आरोपी अतुल हा आपली पत्नी विशाखासोबत अजनी भागातील न्यू कैलासनगर येथे राहत होते. त्यानंतर हे दाम्पत्य गोवा येथे स्थायिक झाले होते. २७ जून २०१४ रोजी दुपारी २.३० वाजताच्या सुमारास आरोपी काटे दाम्पत्य मनोज वैरागडे यांच्या घरी गेले होते. त्यावेळी घरी मनोज वैरागडे यांची पत्नी वंदना ही आपली चिमुकली सृष्टीसोबत घरी होती. सृष्टीला फ्रॉक आणि खाऊ घेऊन देतो, असे वंदनाला सांगून आरोपी दाम्पत्य सृष्टीला सोबत घेऊन गेले होते. सायंकाळ होऊनही काटे दाम्पत्य सृष्टीला घेऊन परत न आल्याने वैरागडे कुटुंबाने त्यांचा शोध सुरू केला होता. काही वेळानंतर काटे दाम्पत्याने मनोजला मोबाईलवर फोन करून आणि एसएमएस पाठवून ‘तुमची मुलगी आमच्या ताब्यात आहे. ती जिवंत पाहिजे असेल तर आम्हाला ५० हजार रुपये पाठवा’, असे म्हटले होते. वंदना वैरागडे यांच्या तक्रारीवरून अजनी पोलिसांनी भादंविच्या ३६३, ३६४ -ए, ३४ कलमान्वये गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी अपहृत मुलगी आणि अपहरणकर्त्यांच्या शोधार्थ चार पथके तयार करून इतरत्र पाठविली होती. दरम्यान, मुलगी मिळावी म्हणून मनोज वैरागडे यांच्या एका मित्राने ३० हजार रुपये एसएमएसनुसार विशाखा काटे हिच्या बँक अकाऊंटमध्ये जमा केले होते. आरोपी दाम्पत्याने शेगाव, अकोला आणि अन्य एका ठिकाणाहून २५ हजार रुपये एटीएममधून काढून घेतले होते.एटीएममधील सीसीटीव्हीमध्ये काटे दाम्पत्याची छायाचित्रे कैद झाली होती. २९ जून २०१४ रोजी आरोपींनी पुन्हा उर्वरित २० हजारासाठी मनोजला फोन केला होता. ही रक्कम अकोला येथे आणून देण्यास त्यांनी सांगितले होते. याबाबत अकोला पोलिसांना सतर्क करण्यात आले होते. त्याचदिवशी धामणगाव रेल्वेस्थानक येथे गोंडवाना एक्स्प्रेसमध्ये या अपहरणकर्त्या दाम्पत्याला अपहृत बालिकेसह ताब्यात घेण्यात आले होते. पोलिसांनी सृष्टीला सुखरूप तिच्या आई-वडिलांच्या ताब्यात दिले होते. अजनी पोलिसांनी काटे दाम्पत्याला अटक केली होती. पोलीस निरीक्षक एस. व्ही. पवार यांनी या प्रकरणाचा तपास करून दोन्ही आरोपींविरुद्ध न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. खटला सुरू असताना आरोपी विशाखा ही पसार झाली होती. त्यामुळे अतुल काटेविरुद्ध वेगळा खटला चालविण्यात आला होता. न्यायालयात एकूण १८ साक्षीदार तपासण्यात आले. गुन्हा सिद्ध होऊन आरोपी अतुल काटे याला भादंविच्या ३६४-ए कलमांतर्गत जन्मठेप आणि १५ हजार रुपये दंड, भादंविच्या ३६३ कलमांतर्गत सात वर्षे सश्रम कारावास तीन हजार रुपये दंड, अशी शिक्षा सुनावण्यात आली. न्यायालयात सरकारच्या वतीने सहायक सरकारी वकील पंकज तपासे तर आरोपीच्या वतीने अॅड. अजय गंगोत्री यांनी काम पाहिले. नायक पोलीस शिपाई अनिल दोनाडकर आणि हेड कॉन्स्टेबल रवीकिरण भास्करवार यांनी न्यायालयीन कामात सहकार्य केले.
नागपुरात खंडणीसाठी तान्हुलीचे अपहरण करणाऱ्या आरोपीला जन्मठेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 04, 2017 8:19 PM
५० हजाराच्या खंडणीसाठी मित्राच्या १० महिन्याच्या मुलीचे अपहरण करणाºया एका आरोपीला अतिरिक्त सत्र न्यायाधीश विभा इंगळे यांच्या न्यायालयाने जन्मठेप आणि १८ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
ठळक मुद्देसत्र न्यायालयाचा निकालअपहृता आरोपीच्या मित्राची मुलगी५० हजाराची मागितली होती खंडणी