नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सक्करदऱ्यातील एका खून प्रकरणामध्ये दोन आरोपींची जन्मठेप व इतर शिक्षा कायम ठेवली, तसेच आरोपींनी या शिक्षेविरुद्ध दाखल केलेले अपील फेटाळून लावले. न्यायमूर्तीद्वय विनय देशपांडे व अमित बोरकर यांनी हा निर्णय दिला.
आरीफ बक्ष मेहबूब बक्ष (३५) व जाकीर बक्ष मेहबूब बक्ष (४०) अशी आरोपींची नावे असून, ते गंजीपेठ येथील रहिवासी आहेत. मृताचे नाव नौशाद होते. ही घटना ५ जानेवारी, २०१३ रोजी रात्री उमरेड रोडवरील शीतला माता मंदिर परिसरात घडली. आरोपींनी जुन्या वादातून नौशादचा चाकू व दगडाने हल्ला करून खून केला. १७ फेब्रुवारी, २०१७ रोजी सत्र न्यायालयाने या दोन्ही आरोपींना जन्मठेपेची कमाल शिक्षा सुनावली. त्या निर्णयाविरुद्ध आरोपींनी उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. सरकारच्या वतीने ॲड.तहसीन मिर्झा यांनी कामकाज पाहिले.