लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सामाजिक चेतना जागवणे, चेतनेला प्रेरणेत रूपांतरित करण्याचे, प्रेरणेला निर्माणासाठी उत्साहित करणे आणि निर्माणाच्या प्रक्रियेत सतत नावीन्यता ठेवण्याचे सामर्थ्य साहित्यात असल्याची भावना दत्ता मेघे आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठाचे प्र-कुलपती डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांनी आज येथे व्यक्त केली. विदर्भ साहित्य संघाच्या ९८व्या वर्धापनदिन सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष मनोहर म्हैसाळकर होते तर विशेष पाहुणे म्हणून वर्धा येथील जय महाकाली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष पं. शंकरप्रसाद अग्निहोत्री उपस्थित होते. व्यासपीठावर विदर्भ साहित्य संघाचे उपाध्यक्ष राजन जैस्वाल, विलास मानेकर व डॉ. चंद्रशेखर मेश्राम उपस्थित होते.
याप्रसंगी अविनाश कोल्हे, चंद्रकांत वानखडे, नामदेव कांबळे, मनोज पाठक, डॉ. प्रमोद कोलवाडकर, गजानन फुसे, डॉ. विजय राऊत, डॉ. शुभंकर कुळकर्णी, नितीन नायगावकर, संजय गणोरकर, उल्हास साबळे, विलास जोशी, रवींद्र जवादे, डॉ. श्याम धोंड यांना विदर्भ साहित्य संघाचे पुरस्कार प्रदान करण्यात आले. विदर्भ साहित्य संघाच्या वर्धा शाखेला उत्कृष्ट शाखेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. श्रीमद् भगवद्गीतेचे सचित्र लेखन करणाऱ्या माधवी बोरीकर यांचा यावेळी विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन शलाका जोशी व स्नेहल शिंदे यांनी केले. प्रास्ताविक प्रकाश एदलाबादकर यांनी केले तर आभार डॉ. गजानन नारे यांनी मानले. सुगंधा लातूरकर-अय्यर यांनी गायलेल्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.
साहित्य संघाला भाषावाद मान्य नाही - मनोहर म्हैसाळकर
साहित्य संघाला भाषावाद मुळीच मान्य नाही. इतर सर्व भाषा मराठीच्या भगिनी आहेत. आमचे सदस्य सर्व भाषिक आहेत. त्यामुळे या सोहळ्याला हिंदी भाषिक का, असा प्रश्न विचारणेच मूर्खपणाचे असल्याची भावना विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष मनोहर म्हैसाळकर यांनी अध्यक्षीय भाषणातून व्यक्त केली.