लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी दिव्यांग, अपंग मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी प्रत्येक मतदान केंद्रांवर दिव्यांगांसाठी आवश्यक सुविधा व व्यवस्था करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील ८ हजार ४११ दिव्यांग मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी हेल्पलाईनसह विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी अश्विन मुदगल यांनी मंगळवारी दिली.भारत निवडणूक आयोग तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनेनुसार सर्वप्रकारच्या अपंग व दिव्यांग व्यक्तींना आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासंदर्भात सूचना दिल्यानुसार जिल्ह्यातील सर्व मतदार केंद्रांवर दिव्यांगांना सहज आणि सुलभपणे मतदान करता यावे यासाठी सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. एखादी व्यक्ती जर अंध किंवा एखाद्या तीव्र शारीरिक व्याधींनी ग्रस्त असेल आणि इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रावरील चिन्ह ओळखण्यास सक्षम नसेल, अशा परिस्थितीत मतदान अधिकाऱ्याच्या परवानगीने सहाय्यक मदत करू शकतो.जिल्ह्यात ८ हजार ४११ दिव्यांग व्यक्तींची नोंद मतदार यादीमध्ये करण्यात आली आहे. यासाठी निवडणूक आयोगाद्वारे उपलब्ध करून देण्यात आलेल्या संकेतस्थळाद्वारे आणि आॅनलाईन अॅपद्वारे नोंदणी झाली असून दिव्यांग मतदाराला व्हिलचेअरची आवश्यकता आहे. त्यानुसार व्हिलचेअर पुरविण्यात येणार आहेत. यासाठी ४३८ व्हिलचेअरची व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी अश्विन मुदगल यांनी दिली.दिव्यांग मतदारांमध्ये अधिक जनजागृती व्हावी, याकरिता यशवंत स्टेडियम, धंतोली येथे अपंग मतदाता सहायता केंद्र स्थापन करण्यात आले आहे. त्यामध्ये अपंग प्रवर्गानुसार कॉल सेंटरची व्यवस्था, ई. व्ही. एम. हाताळणी प्रशिक्षण सेवा, अपंग क्षेत्रात कार्य करणाऱ्या स्वयंसेवी संस्थाचे प्रशिक्षण, विशेष शाळा कर्मचारी प्रशिक्षण, निवडणूक प्रक्रिया संबंधित सर्व समस्यांचे निवारण, जनजागृती कार्यक्रम नोडल अधिकारी अभिजित राऊत हे राबवत आहेत.दिव्यांग मतदारांना मतदान प्रक्रियेत सहज भाग घेता यावा यासाठी विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, जिल्हा निवडणूक अधिकारी अश्विन मुदगल, उप- जिल्हा निवडणूक अधिकारी श्रीमती राजलक्ष्मी शहा, रामटेक उप-जिल्हा निवडणूक अधिकारी श्रीकांत फडके, उपल्हिाधिकारी अविनाश कातडे तसेच प्रशिक्षण नोडल अधिकारी रवींद्र कुंभारे यांनी विशेष नियोजन केले आहे.
दिव्यांगांना मतदान करण्यास प्राधान्यदिव्यांग मतदारांसाठी मतदान केंद्रावर विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यामध्ये अपंग तसेच दिव्यांग व्यक्तींना रांगेत प्रतीक्षेत न राहता मतदान करण्यास प्राधान्य, मतदान केंदावर कायमस्वरुपी किंवा संपूर्ण सुविधा, अंध प्रकारातील मतदारांकरिता ब्रेल लिपीतील मतदार स्लीप, डमी मतदान पत्र (बॅलेट पेपर), अल्पदृष्टी दिव्यांग व्यक्तींकरिता मॅग्नीफार्इंग ग्लास, मॅग्नीफार्इंग शिट इत्यादी साहित्य, अंध मतदारांना मतदान अधिकाºयाच्या परवानगीने मतदारांसह सहकाºयाला सोबत नेण्याची परवानगी, मागणीनुसार ४३८ व्हीलचेअरची व्यवस्था करण्यात येणार आहे, परिसरात सोईसुविधा दर्शक संकेत चिन्ह, अपंग व्यक्तींना मार्गदर्शन व साहाय्य करण्यासाठी विशेष शिक्षक, अपंग शाळेतील कर्मचारी, स्वयंसेवकांची व्यवस्था, शासकीय वाहनाने दिव्यांग मतदारांना ने-आण करण्यासाठी सुविधा, जिल्ह्यात एक पर्यवेक्षक, निरीक्षकाची नियुक्ती करण्यात येणार आहे.
उमरेड विधानसभेत सर्वाधिक दिव्यांगजिल्ह्यात विधानसभा मतदार संघनिहाय दिव्यांगांची नोंद झाली असून यामध्ये १ हजार ७० अंध, ९५३ कर्णबधिर, ४ हजार ८५५ अस्थिव्यंग तर १ हजार ५३३ इतर अपंगत्व मतदारांची नोंद करण्यात आली आहे. सर्वाधिक दिव्यांग मतदार हे उमरेड विधानसभा मतदार संघात १ हजार ३३३ दिव्यांग मतदार असून जिल्ह्यात ते सर्वाधिक आहे. यानंतर रामटेक मतदार संघात १ हजार ११८, काटोल ८५८, सावनेर ७५७, हिंगणा ८१७, दक्षिण- पश्चिम नागपूर ५३०, दक्षिण- नागपूर ४९७, पूर्व- नागपूर ४५६, मध्य- नागपूर ३३८, पश्चिम व उत्तर नागपूर प्रत्येकी ४५१, कामठी ८३२ दिव्यांग मतदारांचा समावेश आहे.