लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: विद्यार्थी हे देशाचे भवितव्य आहेत. त्यांना उत्तम दर्जाचे शिक्षण मिळाले तर उच्च शिक्षणही चांगल्या दर्जाचे घेता येईल असे मत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष लीलाधर ठाकरे यांनी व्यक्त केले. ते पुढे म्हणाले, परंतु आज स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांत पुरेशा सोईसुविधा उपलब्ध नाहीत. एकीकडे सरकारकडून डिजिटल शाळा करण्याचा गवगवा सुरू आहे. प्रत्यक्षात मात्र विद्यार्थ्यांना मूलभूत सुविधाही मिळत नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांची अवस्था बिकट आहे. जिल्ह्यातील अनेक शाळांकडे वीज बिल थकीत असल्याने वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना बसायला साधी बाकडं नाहीत. गणेशासारख्या सुविधा पुरविण्यात विद्यार्थ्यांत जातीच्या नावावर भेदभाव केला जातो. पिण्याचे पाणी, चांगले शौचालय, खेळाचे मैदान या सारख्या मूलभूत सुविधा उपलब्ध नाही. सुविधाच नसतील तर चांगले विद्यार्थी निर्माण होणार नाही. हे चित्र बदलवून गावागावातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा आधुनिक सुविधायुक्त व डिजिटल झाल्या पाहिजेत. शिक्षकांना अशैक्षणिक कामात गुंतवले जाते. शैक्षणिक गुणवत्ता वाढवायची असेल तर शिक्षकांना अशैक्षणिक कामातून मुक्त करून शिक्षणाचीच जबाबदारी द्यावी. अशा स्वरुपाची सुधारणा झाली तरच शैक्षणिक गुणवत्ता वाढेल.
Lok Sabha Election 2019; शाळा व विद्यार्थ्यांना पायाभूत सुविधा द्याव्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2019 11:20 AM